उपमहापौरांच्या प्रभागात समस्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:26 AM2021-04-06T04:26:52+5:302021-04-06T04:26:52+5:30

चंद्रपूर : शहरातील मुख्य आणि उपमहापौरांचा प्रभाग असलेल्या नगिनाबाग प्रभागामध्ये सद्यस्थितीत समस्यांचा डोंगर उभा आहे. विविध ठिकाणी नाल्या ...

A mountain of problems in the deputy mayor's ward | उपमहापौरांच्या प्रभागात समस्यांचा डोंगर

उपमहापौरांच्या प्रभागात समस्यांचा डोंगर

Next

चंद्रपूर : शहरातील मुख्य आणि उपमहापौरांचा प्रभाग असलेल्या नगिनाबाग प्रभागामध्ये सद्यस्थितीत समस्यांचा डोंगर उभा आहे. विविध ठिकाणी नाल्या तुंबल्या असून मुख्य नालाही झुडपांनी वेढला आहे. एवढेच नाहीतर कचरा संकलनावरही अतिरिक्त भार असून घरांच्या तुलनेत कर्मचारी संख्याही कमी आहे. विविध ठिकाणी नाल्या तुंबल्या तर काही ठिकाणी रस्त्याचाही पत्ता नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता वर्षभरावर निवडणूक येणार आहे. त्यामुळे किमान आतातरी प्रभागातील नगरसेवकांनी समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

येथील नगिनाबाग प्रभागात चार नगरसेवक असून हा प्रभाग चोर खिडकी, सिस्टर काॅलनी, नगिनाबाग तसेच जगन्नाथबाबा नगर तसेच अग्रसेन भवनाच्या मागील भागापर्यंत आहे. यामध्ये उपमहापौर असलेले राहुल पावडे तसेच नगरसेवक सविता कांबळे, बंट्टी चौधरी, वंदना तिखे या प्रभागाचे नेतृत्व करतात. प्रभागातील सर्वच्या सर्व नगरसेवक भाजपाचे असून महापालिकेत भाजपाचीच सत्ताही आहे. मात्र सत्ता असूनही पाहिजे तसा विकास करणे नगरसेवकांना जमलेच नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. चोरखीडकी परिसरात तर चिंचाेळ्या रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सिस्टर काॅलनीमध्ये समस्यांकडे अद्यापपर्यंत कुणाचेही लक्ष गेले नसल्याचे बघायला मिळत आहे. काॅलनीमधील नाल्या तुंबल्या आहेत. एवढेच नाहीतर नाल्यामध्ये मोठमोठे झुडपेही वाढली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. विशेष म्हणजे, सिस्टर काॅलनीतील काही घरे आता ईरइ नदीच्या पात्रापर्यंत पोहोचले आहे. मात्र, याकडेही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून घर बांधकामावर निर्बंध लावण्यास पालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे वाट्टेल तिथे नागरिक घर बांधून मोकळे होत आहेत. किमान या बांधकामावर तरी पालिका तसेच स्थानिक नगरसेवकांनी निर्बंध आणणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे, उपमहापौर राहत असलेल्या परिसरातही कचऱ्यांचे ढीग बघायला मिळत असून कचरा संकलकांची संख्या कमी आणि घरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे संकलकांच्या नाकीनऊ येत आहे. किमान कचरा संकलकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी पाहिजे तसे प्रयत्नच केले जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

बाॅक्स

नाल्यावर झुडपे

या प्रभागामध्ये असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मुख्य नाला वाहतो. मात्र, या नाल्याची अवस्था बिकट आहे. सर्वत्र झुडपे वाढली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा असल्यामुळे पाणी अडून आहे. पावसाच्या दिवसांमध्ये थातूरमातूर स्वच्छता केली जाते. मात्र, या दिवसात काय, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

---

नगरसेवकांच्या घरासमोरच कचरा डंम्पिग

येथील नगरसेवक सविता कांबळे यांच्या घराशेजारीच कचरा संकलक कचरा साठवत असून तो टप्याटप्प्याने नेला जातो. मात्र, रस्त्यावरच कचरा साठविला जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त संकलकांची नेमणूक करून त्यांच्यावरील भार कमी करणे गरजेचे आहे.

बाॅक्स

नाल्या कालबाह्य

प्रभागात काही ठिकाणी नाल्या आहेत तर काही ठिकाणी नाल्याच नसल्याचा प्रकार बघायला मिळाला. ज्या ठिकाणी नाल्या आहेत. त्या कालबाह्य झाल्या असून काही ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत आहे. तर काही ठिकाणी मुख्य नाल्याला नाल्या जोडण्यातच आल्या नाहीत. यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रारही केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

--

अनुभवी नगरसेवक मात्र कुचकामी

या प्रभागामध्ये उपमहापौर राहुल पावडे हे महापालिकेतील वजनदार नगरसेवक म्हणून ओळखले जातात. तर बंटी चौधरी यांनीसुद्धा सभापतीपद भूषविले आहे. त्यामुळे या दोघांकडून नागरिकांच्या विकासकामासंदर्भात अनेक अपेक्षा होत्या. मात्र, पाहिजे ते कामच झाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर अन्य दोन नगरसेवकही पाहिजे तसा प्रभाव पाडू शकले नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

बाॅक्स

नागरिक काय म्हणतात...

कोट

तक्रार केली, मात्र नगरसेवक लक्ष द्यायला तयारच नाही. सिस्टर काॅलनी, स्वावलंबी नगर परिसरामध्ये काही रस्ते सिमेंटीकरण झाले. मात्र, आजही अनेक रस्त्यांचे खडीकरणही झाले नाही. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून चालणेही कठीण जात आहे. मोठ्या अपेक्षेने भाजपाला प्रभागात बहुमत देत निवडून दिले. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

- मोहसिन कुरेशी

चंद्रपूर

--

कोट

प्रभाग मोठा असून चार नगरसेवक आहे. मात्र, प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवित आहे. त्यामुळे प्रभागातील समस्या सुटण्याऐवजी वाढतच जात आहे. आता निवडणूक एक वर्षावर आली आहे. त्यामुळे किमान आता तरी या नगरसेवकांनी प्रभागात काम करून विकासकामे करावीत.

- श्रेयश थेरे

चंद्रपूर

कोटनगिनाबाग प्रभाग फार मोठा आहे त्या तुलनेत कचरा संकलकांची संख्या कमी आहे. त्यामुळे संकलकांवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे संकलकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. सोबतच नाल्यांचे बांधकाम करून नाल्यांतील पाणी वाहते करणे आवश्यक आहे.

- नगिनाबाग, चंद्रपूर

Web Title: A mountain of problems in the deputy mayor's ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.