कन्हारगाव अभयारण्य निर्मितीच्या हालचाली
By admin | Published: December 10, 2015 01:16 AM2015-12-10T01:16:29+5:302015-12-10T01:16:29+5:30
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या ३६ व्या बैठकीत प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्य निर्मिती संदर्भात अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी व या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करावा,
स्थानिकांचा मात्र विरोध : समिती स्थापन करण्याचे निर्देश
सुरेश रंगारी कोठारी
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या ३६ व्या बैठकीत प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्य निर्मिती संदर्भात अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी व या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. मात्र प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्य निर्मितीसाठी स्थानिक गावकऱ्यांनी सुरुवातीपासूनच प्रखर विरोध दर्शविला आहे.
उत्तर चंद्रपूर प्रदेश, चंद्रपूर अंतर्गत मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह क्षेत्राचा अभयारण्य निर्मितीसाठी शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला आहे. क्षेत्रामध्ये चांदा वनप्रकल्प विभागांतर्गत ३११३४.६३२ हेक्टर क्षेत्र महामंडळाच्या ताब्यात आहे. यामुळे मध्य चांदा विभाग कायमचा बंद करावा लागणार आहे. महामंडळाने १९७० ते २०१५ पर्यंत १७२११.८०४ हेक्टर क्षेत्रात साग रोपवन केलेली आहे. त्याची किंमत अब्जो रुपये आहे. प्रति वर्षी कोट्यवधी रुपयांच्या महसूलाला मुकावे लागणार आहे. यामुळे वनविकास महामंडळाचे मोठे नुकसान होणार असून कार्यरत कर्मचाऱ्यांवर स्थानांतर पदान्वत, नोकरीतून कमी करणे इत्यादी प्रश्न निर्माण होणार आहेत.
स्थानिक जनतेचे प्रचंड नुकसान
मध्य चांदा वनप्रकल्प विभागाअंतर्गत असलेल्या झरण, कन्हारगाव, तोहोगाव व धाबा परिक्षेत्रातील ४८ गावातील लोक महामंडळाच्या कामावर अवलंबून आहेत. प्रतिवर्ष सरासरी दोन लाख मजूर दिन निर्माण होत असून जंगल परिसरातील जंगल सीमेला लागून असलेल्या गावातील सरासरी दररोज दोन हजार मजूर कामावर असतात. या मजुरांना कामापासून वंचित राहावे लागणार असून कुटुंबाच्या उर्दरनिर्वाहासाठी इतरत्र भटकावे लागणार आहे. त्यांना मजुरीची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. अशात वने व वन्य प्राणी संवर्धन व संरक्षण योग्य प्रकारे होत असते. अभयारण्य निर्माण करुन शासन काय साध्य करणार आहे, असा सवाल गावकरी करीत आहेत. विदर्भात आधीपासूनच ताडोबा, मेळघाट, पेंच ही राष्ट्रीय उद्याने तसेच बोर, चपराळा, टिपेश्वर गुगामल, सिपान, वान व काटेपूर्णा अभयारण्य पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. असे असतानाही नागझिरा, कोका, नवीन बोर, मानासिंग देव, उमरेड, कन्हाडा या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. मात्र निर्मितीनंतर व्यवस्थापनाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. तसेच बाधित लोकांच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. वाघाच्या भ्रमणक्षमतेवर निष्कर्ष निघालेला नसताना मेळघाट व अन्य चार अभयारण्यामध्ये वाघाच्या शिकारी याच भागात झाल्या आहेत. वने व वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धन चांगले होत असताना अभयारण्य निर्माण करुन काय साध्य होणार आहे, असा सवाल चर्चिला जात आहे.(वार्ताहर)