कोरपना तालुक्याच्या विभाजनाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:26 AM2018-10-05T00:26:09+5:302018-10-05T00:27:39+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या विभाजनाच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर या नव्या तालुक्याची निर्मिती करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी बुधवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या विभाजनाच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर या नव्या तालुक्याची निर्मिती करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी बुधवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.
चंद्रपूर मुख्यालयापासून कोरपना हे ७० किलोमीटर अंतरावर आहे. माणिकगड, अल्ट्राटेक, कोळसा खाणी यासारखे उद्योग या तालुक्यात आहेत. याशिवाय अनेक गावेही या तालुक्यात समाविष्ट आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे शहर औद्योगिकदृष्टया विकसित आहे. उद्योगांमुळे हे शहर चांगलेच परिचित झाले आहे. दरम्यान, १६ जानेवारी २०१६ मध्येच तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर या नव्या तहसीलची निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून विभागीय आयुक्तांनी प्रस्तावात काही त्रुट्या अधोरेखित केल्या होत्या. त्या संदर्भातील पत्र जिल्हाधिकाºयांना पाठविले होते.
त्यानंतर राजुरा येथील उपविभागीय अधिकारी आणि आस्थापना शाखेतील प्रभारी अधिकारी यांना त्रुट्यावरील मुद्यांवर माहिती मागविण्यात आली. त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर त्रुट्याविरहित प्रस्ताव जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी बुधवारी विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठविला आहे. विभागीय आयुक्तांकडून हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे. शासनाने मंजुरी दिल्यास चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर या नव्या तालुक्याची निर्मिती होऊन १६ तालुके अस्तित्वात येईल. विशेष म्हणजे, नव्या तालुक्यापासून महसुली मंडळाचे अंतर, प्रवाशांना लागणारा वेळ व उपलब्ध प्रवासांची साधने याबाबींचा प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासून गडचांदूरचे अंतर ५० किलोमीटर असल्याचेही प्रस्तावात नमूद केले आहे.
असे असणार क्षेत्रफळ
सध्या कोरपना तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५७ हजार ८० हेक्टर आर आहे. यातून प्रस्तावित गडचांदूर तालुक्यात समाविष्ट करावयाचे क्षेत्रफळ २४ हजार ४१४ हेक्टर आर असणार आहे. तसे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. कोरपना तालुक्यातील कोरपना मंडळात गावांची संख्या ६८ आहे. तर गडचांदूर महसूल मंडळात ४५ गावे आहेत.
न.प. व ग्रा.पं. ची संख्या
कोरपना तालुक्यात एक नगर परिषद, एक पंचायत समिती (कोरपना), एक नगरपंचायत (कोरपना) व ग्रामपंचायतीची संख्या ५२ आहे. या तालुक्याचे विभाजन झाल्यास प्रस्तावित गडचांदूर तालुक्यात एक नगरपरिषद (गडचांदूर), एक पंचायत समिती (गडचांदूर प्रस्तावित) आणि ग्रामपंचायतींची संख्या २२ असणार आहे.
अशी असणार लोकसंख्या
सध्या कोरपना तालुक्याची लोकसंख्या एक लाख २५ हजार ३१७ एवढी आहे. पाच कनिष्ठ महाविद्यालये आहेत. पाच आरोग्य केंद्रे आहेत. याशिवाय दोन पोलीस स्टेशन आहे. विभाजन झाल्यास प्रस्तावित गडचांदूर तालुक्याची लोकसंख्या ७६ हजार ३९५ असेल. याशिवाय दोन कनिष्ठ महाविद्यालये, तीन आरोग्य केंद्रे व एक पोलीस ठाणे असणार आहे. तसे जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या प्रस्तावात नमूद आहे.