चंद्रपुरात डॉक्टरांचे आंदोलन
By admin | Published: June 7, 2017 12:39 AM2017-06-07T00:39:57+5:302017-06-07T00:39:57+5:30
डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचा कायदा संसदेने मंजूर करावा यासह अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडीकल असोसिएनतर्फे मंगळवारला ‘दिल्ली चलो’ अभियान राबविण्यात आले.
चारतास सेवा बंद : दिल्लीच्या आंदोलनात अनेकांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचा कायदा संसदेने मंजूर करावा यासह अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडीकल असोसिएनतर्फे मंगळवारला ‘दिल्ली चलो’ अभियान राबविण्यात आले. यावेळी देशातील सर्व डॉक्टरांनी ‘इंडिया गेट’वर धरणे आंदोलन केले. यामध्ये चंद्रपुरातील आयएमए संस्थेने आयएमए सभागृहात सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत धरणे आंदोलन केले. आंदोलन काळात एकही रुग्णांची तपासणी करण्यात आली नाही.
१८ राज्यांमध्ये डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याविरोधात कायदे झाले आहेत. मात्र तरीही असे प्रकार थांबताना दिसत नाहीत.
केंद्र सरकार मेडीकल कौन्सिल आॅफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी लालफितीच्या डॉक्टरांचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व नसलेले नॅशनल मेडीकल कमिशन आणू पाहत आहे. त्याऐवजी मेडीकल कौन्सिल आॅफ इंडिया याच संस्थेत आवश्यक ती सुधारणा करावी. एमबीबीएस करताना तो विद्यार्थी विविध प्रकारच्या परीक्षा सरकारमान्य विद्यापीठातून देत असतो.
नंतर एमबीबीएस उत्तीर्ण केल्यावरही प्रॅक्टीस सुरू करण्यासाठी आणखी एक नेक्स्ट नावाची परीक्षा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. अशी परीक्षा रद्द करावी, तसेच एमबीबीएसची अंतीम वर्षाची परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात यावी, परीक्षेचा निकाल लागल्यांतर ४५ दिवसाच्या
आत पीजी-नीट परीक्षा घ्यावी, वैद्यकीय व्यवसाय व निष्काळजीपणामुळे होणाऱ्या कायदेशीर कारवाईत गुन्हेगारी स्वरूपाचे कलम लावू नये, आंतर-मंत्रालयीन समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.