प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयांसोबत आंदोलन
By admin | Published: March 2, 2017 12:33 AM2017-03-02T00:33:20+5:302017-03-02T00:33:20+5:30
दोन वर्षापूर्वी जमिनीचा मोबदला देवून अधिग्रहण केले. तसेच एक वर्षापूर्वी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याकरिता प्रशिक्षण दिले.
वेकोलिला लाखोेंचा फटका : अद्याप तोडगाच निघाला नाही
वरोरा/माजरी : दोन वर्षापूर्वी जमिनीचा मोबदला देवून अधिग्रहण केले. तसेच एक वर्षापूर्वी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याकरिता प्रशिक्षण दिले. त्या जमिनीतून वेकोलिने कोळसा काढणे सुरु केले. परंतु प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली नाही. याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी सकाळी ८ वाजेपासून कुटुंबियांसमवेत खाण बंद आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे खाणीचे काम बंद पडून वेकोलिला लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवाजी नगर, माजरी, नागलोन पाटाळा आदी गावातील शेतकऱ्यांची शेत जमीन दोन वर्षापूर्वी मोबदला देवून अधिग्रहीत केली होती. प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याकरिता वेकोलिने आवश्यक कागदपत्र प्रकल्पग्रस्तांकडून घेतली. या जमिनीतून काही महिन्यापासून वेकोलिने उत्पादन सुरु केले. प्रकल्पग्रस्तांनी नोकरी मिळावी, याकिरता वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली. परंतु आजतागायत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत रुजू करुन घेतले नाही. प्रकल्पग्रस्तांना एक वर्षापूर्वी वैद्यकीय तपासणी करुन प्रशिक्षण दिले. त्यानंतरही नोकरी देण्यास वेकोलि टाळाटाळ करीत असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांची झाल्याने त्यांनी आज बुधवारपासून आपल्या कुटुंबियांसोबत खाण बंद आंदोलन केले. (लोकमत चमु)
चर्चा फिस्कटली
वेकोलिचे अधिकारी व प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांना प्रति दिवशी सात प्रकल्पग्रस्तांना रुजू करुन घेण्याचे आश्वासन दिले. परंतु प्रकल्पग्रस्तांना एकत्रित रुजू करुन घेण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी केल्याने चर्चा फिस्कटली होती.
सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर
जमिनी गेल्यानंतर उत्पादन सुरु झाले. परंतु सातबारावर नाव शेतकऱ्यांचे आहे. जमिनीच्या सातबारावर शेतकऱ्यांचे नाव असताना आंदोलनाकरिता प्रशासनाने तंबू टाकू दिला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. भर उन्हात प्रकल्पग्रस्त आपल्या कुटुंबीयांसोबत दिवसभर आंदोलन करीत होते.