सातव्या दिवशीही हॉकर्स सेनेचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 09:45 PM2018-09-02T21:45:32+5:302018-09-02T21:45:48+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते बिनबा गेटपर्यंत दर रविवारी संडे मार्केट भरविला जात होता. याविरूद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते बिनबा गेटपर्यंत दर रविवारी संडे मार्केट भरविला जात होता. याविरूद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने हा बाजार हटविण्याचा आदेश दिला. त्यामुळे फेरीवाल्यांचा संडे बाजार सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष तथागत पेटकर यांच्या नेतृत्वात २७ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले. सातव्या दिवशीही हे आंदोलन सुरूच असून आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.
चंद्रपुरातील चार झोनमध्ये फेरीवाल्यांच्या प्रतिनिधीला संधी देऊन झोन पथकर समिती गठित करावी, शहरातील हातठेलेधारक, टपरीधारक, भाजी व कापड विके्रत्यांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शहर पथकर समिती स्थापन होईपर्यंत लहान विके्रत्यांना मनपाने संरक्षण द्यावे, नाईट प्लॉझा, खाऊ गल्ली आणि फे स्टिवलकरिता मनपाने नियोजन करावे, संडे मार्केट पुर्ववत सुरू करावे, रस्त्यावरील विके्रता उपजीविका संरक्षण अधिनियम २०१४ अंतर्गत शहरातील सर्व फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मूभा देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
मंगळवारी मोर्चा
फेरीवाल्यांच्या विविध समस्यांना घेऊन रिपब्लिकन हॉकर्स सेना, विविध लघू व्यापारी संघटना, तसेच फेरीवाल्यांचा आंदोलनाला समर्थक करणाऱ्या संघटनाकडून मंगळवार दि. ४ सप्टेंबर रोजी महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन हॉकर्स सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. पेटकरने दिली.