अंगणवाडी महिलांचे धरणे आंदोलन
By admin | Published: October 20, 2014 11:10 PM2014-10-20T23:10:39+5:302014-10-20T23:10:39+5:30
थकीत मानधन तातडीने देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी अंगणवाडी सेविकांनी येथे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
चंद्रपूर : थकीत मानधन तातडीने देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी अंगणवाडी सेविकांनी येथे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
दुर्बल घटकातील अल्पश: मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांना केलेल्या कामाचे हक्काचे मानधन मिळविण्याकरिता दर चार महिन्याला रस्त्यावर यावे लागते. याची खंत शासनकर्त्यांनाही नाही. दिवाळी तोंडावर आली असताना गेल्या तीन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यात आले नाही. यामुळे अंगणवाडी महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे तो सोमवारी धरणे कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरला.
मार्गदर्शनपर भाषणात प्रा. दहीवडे म्हणाले, निवडणुकीच्या काळातच त्यांना गरीबांची आठवण येते. त्यांची फसवणूक करण्याकरिता पैशाचे तसेच निरनिराळ्या वस्तुचे वाटप करुन मते आपल्याकडे खेचण्याचे काम ते करतात. अशा या लोकशाहीच्या हत्याऱ्यांना आम्ही निवडून देतो. हे आधुनिक काळातील सुधारीत दरोडेखोर आहे. त्यांच्याकडून कल्याणकारी राज्यांची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असे ते म्हणाले. शोभा बोगावार यांनी देखील सरकारच्या जनविरोधी धोरणावर सडकून टिका केली. दिवाळीपूर्वी सर्व थकीत मानधन मिळाले पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली. वर्षा वाघमारे म्हणाल्या, अंगणवाडी महिलांना एक महिन्याचे मानधन दिवाळी भेट म्हणून देण्यात यावे. धरणे आंदोलनानंतर शिष्टमंडळ मुख्यकार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांना भेटले व मागण्याचे निवेदन सादर केले. थकीत मानधन दिवाळीपूर्वी देण्यात यावे, अतिरिक्त अंगणवाडी सेविकेची नियुक्ती ठेका पद्धतीने न करता विभागाच्यावतीने करण्यात यावी. थकीत टी.ए. तथा डी.ए. देण्यात यावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. संध्या बुटले यांच्या आभाराने आंदोलन संपले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी आशा पोगुलवार, गुजाबाई डोंगे, लता झाडे, शोभा कासर्लेवार, रत्नमाला वाघमारे, सुषमा धोंगडे, पवित्रा ताकसांडे, अल्का नळे, प्रणिता लांडगे, आशा नाखले, रेखा रामटेके यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)