मनपा सफाई कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:07 PM2018-11-10T22:07:29+5:302018-11-10T22:07:54+5:30
चार दिवसांपासून सुरू असलेल्या स्वच्छता कामगारांच्या आंदोलनाकडे मनपा पदाधिकारी व अधिकारी डोळेझाक करीत आहेत. कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण असल्याने मागण्या मान्य करण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली. शनिवारी आंदोलनस्थळी भेट घेऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपाकडून कंत्राटदाराला ५८० रूपये दिले जाते. परंतु कामगारांना फक्त २५६ रूपये देण्यात येते, असा आरोपही त्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चार दिवसांपासून सुरू असलेल्या स्वच्छता कामगारांच्या आंदोलनाकडे मनपा पदाधिकारी व अधिकारी डोळेझाक करीत आहेत. कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण असल्याने मागण्या मान्य करण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली. शनिवारी आंदोलनस्थळी भेट घेऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपाकडून कंत्राटदाराला ५८० रूपये दिले जाते. परंतु कामगारांना फक्त २५६ रूपये देण्यात येते, असा आरोपही त्यांनी केला.
दुपारी ३ वाजता माजी खासदार पुगलिया यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. कामगारांच्या सर्व मागण्या कायद्याला अनुसरून असल्याने या आंदोलनाला सक्रीय पाठींबा देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. सोमवारी १२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनकर्त्याचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना आंदोलनकर्ते विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. यानंतरही आंदोलनकर्त्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहेत, याकडेही माजी खा. पुगलिया यांनी लक्ष वेधले. कामगारांनी तर मनपाच्या अन्यायाचाच पाढा वाचला.
यावेळी चंद्रपूर शहर महानगरपालिकाचे काँँग्रेसचे गटनेता डॉ. सुरेश महाकुलकर, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष गजाननराव गावंडे, चंद्रपूर जिल्हा काँँग्रेसचे महासचिव अॅड. अविनाश ठावरी, इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, नगरसेवक प्रशांत दानव, अशोक नागापूरे, नगरसेवक प्रवीण पडवेकर, युवक काँंग्रेसचे पंकज गुप्ता व शेकडो कार्यकर्ते, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आंदोलनस्थळी कामगारांसह फराळ दिवाळी
किमान वेतनासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी महानगर पालिकेच्या सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पूकारले आहे. त्यांच्या आंदोलनाचा शनिवारी चौथा दिवस असला तरी मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कामगारांची दिवाळी अंधारात गेली आहे. दरम्यान, किशोर जोरगेवार यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांसोबत फराळ करत दिवाळी साजरी केली. कामगारांची दिवाळी अंधारमय करत स्वत:ची दिवाळी उत्साहात साजरी करणाऱ्यांच्या जीवणात कधीच प्रकाश येणार नाही, असे वक्तव्यही यावेळी जोरगेवार यांनी केले. कामगारांच्या मागण्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली. कामगारांच्या आंदोलनाने शहरात साचलेल्या घाणीमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. याचा मोठा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यताही जोरगेवार यांनी वर्तविली. कामगार बेमुदत उपोषणावर पूर्णत: ठाम आहेत. यावेळी विनोद अंनतावार, सुनिल पाटील, वंदना हातगावकर, संतोषी चौव्हाण, सुजाता बल्ली, राजेश मंगळूरकर, संजय मेश्राम, पुण्यवर्धन मेश्राम आदी उपस्थित होते.