ओबीसी आरक्षण रद्दविरोधात आज आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:34+5:302021-06-26T04:20:34+5:30
चंद्रपूर : ओबीसींच्या आरक्षण रक्षणासाठी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जून राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी ...
चंद्रपूर : ओबीसींच्या आरक्षण रक्षणासाठी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जून राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी सामाजिक न्यायदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौकात सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यामागे राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा घाट असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीने संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.