विदर्भवाद्यांच्या आंदोलनाचा डाव उधळला
By admin | Published: September 21, 2016 12:42 AM2016-09-21T00:42:33+5:302016-09-21T00:42:33+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीने ३ सप्टेंबरला मुंबई येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत...
कार्यकर्त्यांना अटक व सुटका : बाळा नांदगावकर यांचा करणार होते निषेध
वरोरा : विदर्भ राज्य आंदोलन समितीने ३ सप्टेंबरला मुंबई येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनसे कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला होता. त्याचे पडसाद विदर्भात पाहावयास मिळाले. ही घटना घडल्यानंतर मंगळवारी मनसे नेते बाळा नांदगावकर हे वणी येथील कार्यक्रमाकरिता वरोरा येथून जाणार असल्याची माहिती विदर्भवाद्यांना कळताच विदर्भवाद्यांचा ताफा रत्नमाला चौकात पोहोचला व काळे झेंडे दाखवून निषेध करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी विदर्भवाद्यांना अटक करून आंदोलनाचा डाव उधळला.
स्वतंत्र विदर्भासाठी ३ व ४ आॅक्टोबरला प्रति विधानसभेचे आयोजन करणाऱ्या नागपूरच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे पडसाद १४ सप्टेंबरला वरोरा शहरातही दिसून आले. वरोरा येथील सद्भावना चौकात काळ्या फिती लावून मनसेचा झेंडा जाळून निदर्शने देत निषेध नोंदविण्यात आला होता. त्याच्या प्रतिउत्तरात मनसेचे तालुकाध्यक्ष मनीष जेठानी यांनी मनसेच्या झेंड्यावर अखंड महाराष्ट्र, असा लिहिलेल्या झेंडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात झेंडा फडकविला होता.
मंगळवारी मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर हे वणी येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिर व कार्यकर्ता मेळाव्याला वरोरा येथून जात असल्याचे विदर्भवाद्यांना कळताच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोर कमेटी सदस्य अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या नेतृत्वात बाळा नांदगावकर यांना काळे झेंडे दाखवून मुंबई येथील घटनेचा निषेध करण्याची तयारी होती. पोलिसांना आंदोलनाची भनक लागताच वरोरा पोलिसांनी कोर कमेटी सदस्य अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, युवा आघाडी जिल्हा सचिव आशिष घुमे, वरोरा तालुका अध्यक्ष सुधाकर जीवतोड यांना अटक करून काही वेळानंतर त्यांची सुटका केली. त्यामुळे विदर्भवाद्यांचे आंदोलन पूर्ण होऊ शकले नाही. (शहर प्रतिनिधी)
विदर्भ राज्याला
विरोध नाही
बाळा नांदगावकर यांनी मनसे वरोरा तालुका कार्यालयाला भेट दिली व वेगळ्या विदर्भाबाबत बोलताना, सामान्य जनतेला वेगळा विदर्भ पाहिजे असेल तर त्या विषयी आमचे काहीच म्हणणे नाही. मात्र मूठभर लोकांना जर वेगळा विदर्भ हवा असेल तर आमची अखंड महाराष्ट्राची भूमिका कायम राहणार आहे, अशी प्रतिक्रीया दिली.