करवाढीच्या नोटीसविरोधात आंदोलनाचा इशारा
By admin | Published: October 14, 2016 01:23 AM2016-10-14T01:23:41+5:302016-10-14T01:23:41+5:30
महानगरपालिकने मालमत्ता करवाढ होणार नाही, असे मे महिन्यातील आमसभेत सांगण्यात आले होते.
महाराष्ट्र लोकशाही आघाडी : नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप
चंद्रपूर : महानगरपालिकने मालमत्ता करवाढ होणार नाही, असे मे महिन्यातील आमसभेत सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात आता पुन्हा १ सप्टेंबर रोजी नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. महानगरपालिकेची ही कृती नागरिकांच्या डोळ्यात शुद्ध धूळफेक आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र विकास आघाडीने गुरूवारी मनपाविरोधात दंड थोपटले आहे.
महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे प्राश्र नामदेव कन्नाके म्हणाले की, यापूर्वी मनपाच्या करवाढीविरोधात विविध संघटनांनी आंदोलने केली. त्या आंदोलनामुळे मनपाच्या मे महिन्यातील आमसभेत २०१६-१७ या सत्रामध्ये करवाढ होणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर महापौर राखी कंचर्लावार व तत्कालीन आयुक्त सुधीर शंभरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन करवाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, पुन्हा नागरिकांना करवाढीची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीस रद्द ठरविण्यात येऊन जुन्याच दराने कर भरण्याचे आवाहन करणाऱ्या नवीन नोटीस बजावण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली.
जनतेचे वाढीव कराचा भरणा करू नये. २४ आॅक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करवाढीविरोधात धरणे देण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. कन्नाके यांनी केले.
याबाबत सत्य जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या शिष्टमंडळाने मनपा उपायुक्त डॉ. विजय इंगोले यांची भेट घेतली. त्यावेळी उपायुक्त इंगोले म्हणाले की, जे नोटीस देण्यात आलेले आहेत, ते आमसभेतील निर्देशाप्रमाणे आहेत. आमसभेत ठराव पारित करण्यात आला आहे, असेही इंगोले म्हणाले, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.
चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांपेक्षा अधिक आहे. तर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ६० वर्षे जुनी आहे. त्यामुळे ही पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटलेली असून त्यातून पाणी वाहून जाते. तसेच गटारातील दूषित पाणी लिकेजसद्वारे नळाच्या पाण्यात शिरण्याची शक्यता आहे. नळाद्वारे दूषित पाणी मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार भवनातील पत्रपरिषदेला सोशालिस्ट पार्टीचे किशोर पोतनवारल अंकुश वाघमारे, गोपी मित्रा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)