आरटीओच्या कारभाराची पारदर्शकतेकडे गतीने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:51 PM2019-02-16T21:51:47+5:302019-02-16T21:52:34+5:30

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय म्हणजेच आरटीओमध्ये दलालांना पैसे मोजल्याशिवाय कामेच होत नाही, असा सर्वसामान्य नागरिकांचा समज. हा समज खोटा ठरविण्यासाठी वर्षभरापूर्वी येथे रुजू झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी तब्बल ९५ टक्के सेवा आॅनलाईन केल्या आहेत.

Moving fast towards the transparency of the RTO regime | आरटीओच्या कारभाराची पारदर्शकतेकडे गतीने वाटचाल

आरटीओच्या कारभाराची पारदर्शकतेकडे गतीने वाटचाल

Next
ठळक मुद्दे९५ टक्के सेवा आॅनलाईन : वाहनधारकांना वेळ आणि पैसा वाया घालवण्याची गरज नाही

राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय म्हणजेच आरटीओमध्ये दलालांना पैसे मोजल्याशिवाय कामेच होत नाही, असा सर्वसामान्य नागरिकांचा समज. हा समज खोटा ठरविण्यासाठी वर्षभरापूर्वी येथे रुजू झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी तब्बल ९५ टक्के सेवा आॅनलाईन केल्या आहेत. यामुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयात पैसा व वेळ वाया दवडण्याची गरज उरली नाही. घरबसल्या येथील सेवांचा आॅनलाईन पद्धतीने लाभ घेता येणार आहे. या सेवा डब्लूडब्लूडब्लू.परिवहन.जीओव्ही.इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये वाहन ४.० व सारथी ४.० या प्रणालीमध्ये आॅनलाईन कामे करता येणे सहज शक्य झाले आहे.
वाहन ४.० प्रणालीमध्ये परिवहन संवर्गातील तसेच खासगी वाहनांची सर्व कामे करता येते. यात नवीन वाहनांची नोंदणी, वाहन कर भरणे, नोंदणी शुल्क भरणे, वाहनाचे नाहरकत प्रमाणपत्र एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात स्थलांतर करणे, वाहन हस्तांतरण, वाहनाला दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, वाहनावर कर्जाचा बोझा चढविणे वा उतरविणे, योग्यता प्रमाणपत्रासाठी आगाऊ वेळ घेणे, सोबतच योग्यता प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येत आहे. शुल्क भरणे, सर्व पद्धतीचे परवाने काढणे या सेवा आॅनलाईन पद्धतीने जनतेला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा लाभ जनता घेत असून आतापर्यंत ६० हजार ६३२ दुचाकी व ६ हजार १५ चारचाकी वाहनांची नोंद देखील झालेली आहे.
सारथी ४.० प्रणालीमध्ये परवाना पद्धतीची सर्व कामे आॅनलाईन पद्धतीने केल्या जात आहे. यामध्ये शिकाऊ व पक्का परवाना काढणे, त्यासाठी आगाऊ वेळ घेणे, परवानाबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र पाठविणे वा मागणे परवान्याचे नुतणीकरण, परवान्याची दुय्यम प्रत काढणे, कंडक्टर बॅच, रिक्षा, टॅक्सी वा बस बॅच काढणे तसेच या सर्व बाबींचे शुल्क भरणे ही कामे करता येते. यासोबतच खटला विभागातील कामेही आॅनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लोकांचा पैसा व श्रमाची बचत होत आहे.
आरटीओ हद्दीतील सर्व सीमा तपासणी नाके बीओटी तत्त्वावर असून ते संगणकीकृत केलेले आहेत. आता येथे प्रत्येक वाहनाला आॅटोमेटीक वजनकाटा पावती व इतर कागदपत्रांबाबत तपासणी होते. जनतेचा वेळ व पैसा वाचावा या दृष्टीने जिल्ह्यात पहिल्या शनिवारी आनंद निकेतन कॉलेज वरोरा, तिसºया शनिवारी एन.एच. कॉलेज ब्रह्मपुरी व शेवटच्या शनिवारी एस.पी. कॉलेज गडचांदूर या तीन ठिकाणी शिबिर कार्यालय आयोजित करण्यात आले आहेत. या ठिकाणी योग्यता प्रमाणपत्राबाबतची कामे वगळून इतर सर्व कामे केली जात आहे.
भंगार वाहनातून शासनाच्या तिरोजीत २८.२३ लाखांचा महसूल
आरटीओ कार्यालय परिसरात असलेल्या भंगार वाहनांचा वर्षभरात दोनदा लिलाव करण्यात आला. यामुळे तब्बल २८ लाख २३ हजारांचा महसूल शासनाच्या तिजोरी जमा झाला. विशेष म्हणजे, या लिलावामुळे कार्यालयाच्या आवाराची जागा मोकळी झाली असून ती इतर कामासाठी उपलब्ध झालेली आहे.
आरटीओ कार्यालयही होणार प्रशस्त व सुसज्ज
कार्यालय परिसराच्या सुभोभीकरणासाठी ९५ लाख रुपये मंजूर झाले असून कामे गतीने सुरू आहे. ही कामे पूर्णत्वास गेल्यास ड्रायव्हींग टेस्ट तसेच जनतेसाठी व कार्यालयीन कर्मचाºयांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था होणार आहे. विद्यमान इमारतीत कार्यालयाचा व्याप सांभाळणे कसरतीचे जात होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे वरील दोन मजल्यासाठी निधी मंजूर झाला. बांधकाम सुरू असून वर्षभरात ते पूर्ण होतील. यानंतर सर्व सुविधायुक्त प्रशस्त इमारतीत कार्यालयाचा कारभार चालणार आहे. नवीन सुविधांमुळे वाहनधारक नागरिकांची विविध कामे जलद गतीने पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
अवैध प्रवासी वाहतुक; ४५ लाखांचा महसूल वसुल
अवैध प्रवासी वाहतुकीवर जरब बसविण्यात चंद्रपूर आरटीओला यश आले आहे. २०१७-१८ वर्षाच्या तुलनेत तब्बल १५ लाख ६५ हजारांनी महसूलात वाढ झाली आहे. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ मध्ये २९ लाख २६ हजारांचा महसूल वसुल केला होता. या तुलनेत एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ मध्ये तब्बल ४४ लाख ९७ लाखांचा महसूल वसुल केला आहे.
महसुलात १.१६ कोटींनी वाढ
चंद्रपूर आरटीओेने एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ मध्ये ८० कोटी ५ लाख एवढा महसूल शासनाला दिला होता. यामध्ये मागील वर्षभरात तब्बल १ कोटी १६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ मध्ये ८१ कोटी २१ लाख ५ हजार एवढा महसूल शासनाच्या तिजोरी जमा केला आहे.
रस्ता अपघातात ८.५ टक्क्याने घट
रस्ता सुरक्षा विषयावर युद्ध पातळीवर कामकाज सुरू आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी व वाहतुक पोलीस नियंत्रण शाखेच्या सहकार्याने अपघातात घट आणण्यात यश आले आहे. २०१७ च्या तुलनेत अपघातातील मृत्यूसंख्या ८.५ टक्क्याने कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३२४ मृत्यूसंख्या होती ती २०१८ मध्ये २९७ वर आली. यावर्षी पुन्हा अपघातात घट होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परवानाधारक व परवाना नुतणीकरण करणाºयांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन वाहतुकीच्या नियमांची उजळणी करून देण्याचा मानस आहे.

आरटीओकडे जनतेला पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक नाही. पैसा दिल्यावरच कामे होतात. असा समज सर्वसामान्य आहे. हे कार्यालय लोकाभिमुख करण्यासाठी कारभारात पारदर्शकता आणणे गरजेचे होते. म्हणूनच येथील सेवा आॅनलाईन पद्धतीने देण्यावर भर देण्यात आला. नागरिक घरबसल्या आपली आरटीओतील कामे करायला लागली तर ते येथे येणार नाही. यामुळे कारभार पारदर्शक होण्यास मदत मिळत आहे. यामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांचे मार्गदर्शन व जिल्हाधिकाºयांचे सहकार्य यामुळेच हे शक्य होत आहे.
- विश्वांभर शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर.

Web Title: Moving fast towards the transparency of the RTO regime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.