राष्ट्रसंताच्या तपोभूमीची विकासाकडे वाटचाल
By admin | Published: April 12, 2017 01:00 AM2017-04-12T01:00:22+5:302017-04-12T01:00:22+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी-गोंदेडा येथे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नातून तब्बल १४ कोटींची विकास कामे सुरू आहेत.
पेंढरी (कोके) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी-गोंदेडा येथे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नातून तब्बल १४ कोटींची विकास कामे सुरू आहेत. आगामी काही दिवसांत तपोभूमीचा कायापालट होवून बारमाही पर्यटकांची पाऊले तपोभूमीकडे आपोआप वळतील.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अवघ्या ११ व्या, १२ व्या वर्षी गोंदोड्यात येऊन आपली साधना पूर्ण केली. तेव्हापासून या भूमीला साधना किंवा तपोभूमी असे म्हणतात. चिमूरचे तत्कालीन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निधीतील बांधकाम वगळता इतर आमदार-खासदारांनी तपोभूमीसाठी निधी खेचून आणला नाही. त्यांनी फक्त भूमिपूजनाचे दगड तेवढे गाडले. त्यामुळे गोंदेडा तपोभूमी आजपर्यंत विकासापासून कोसो दूर राहिली.
त्यानंतर भाजपाचे तत्कालीन खा. नामदेवराव दिवटे यांच्या निधीतून पाच लाखांचे सभागृह, प्रा. महादेवराव शिवणकर यांच्या निधीतून अंदाजे २० लाखांचे राष्ट्रसंताच्या निवासस्थानाचे बांधकाम येथे झाले आहे. राष्ट्रसंतावर ुनि:स्सिम प्रेम करणारे गुरुदेवसेवक ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्याच्या थेट अर्थसंकल्पात ४.४३ कोटींची तरतूद केली आणि तेव्हापासून चिमूर क्षेत्राचे आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी कामाचा सपाटा लावला आहे. त्यामध्ये जैविक उद्यान, सिमेंट रस्ते, ध्यान मंदिर आदींचा समावेश आहे. या भूमीला ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या भूमीचा लवकरच कायापालट होणार आहे. (वार्ताहर)