कीटकजन्य व जलजन्य आजारांसंबंधी मनपा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:35 PM2018-08-04T22:35:45+5:302018-08-04T22:36:23+5:30
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविधप्रकारचे आजार उद्भवतात. अशा कीटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका गंभीर असून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविधप्रकारचे आजार उद्भवतात. अशा कीटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका गंभीर असून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
पावसाळ्यात शहरी व ग्रामीण भागात कीटकजन्य व जलजन्य साथींचे आजार पसरण्याची दाट शक्यता असते. त्यात मलेरिया, मेंदूज्वर, डेंग्यू डायरिया, डिसेंट्री, गॅस्ट्रोसारख्या रोगांचा समावेश असतो. या रोगांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागात जनजागृतीसाठी हँडबिल्स वितरित करण्यात येत आहेत. एमपीडब्लू, एएनएम, व आशा वर्करमार्फत सर्वेक्षणाद्वारे तापाचे रुग्ण शोधणे, रक्त नमुने घेणे व त्यावर औषधोपचार करण्याचे कार्य सुरु आहे. तसेच डासअळीसंबंधी कंटेनर सर्वे करण्यात येत आहे. आवश्यक तेथे अबेट औषधी टाकण्यात येत आहे. एमपीडब्लूमार्फत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया तपासणी करण्यात येत आहे. बाह्य सेवासत्र दरम्यान कीटकजन्य व जलजन्य आजारासंबंधी आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. तसेच मनपा स्वच्छता विभागामार्फत फॉगिंग, स्प्रेर्इंग, नाली सफाई, घंटागाडीमार्फत घरा-घरातील कचरा उचलण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करावे, सोसायट्यांतील रहिवाशांनी जमिनीखालील व जमिनीवरील टाक्या स्वच्छ कराव्यात, परिसरात कचरा साचू देऊन नये, पिकलेली फळे खाऊ नयेत तसेच पाणी उकळून व गाळून प्यावे. उघड्यावरील कापलेली फळे, उसाचा रस अशा गोष्टी पावसाळ्यात खाणे टाळावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
डासांची उत्पत्ती टाळण्याचे प्रयत्न करावे
कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती होऊ न देणे आवश्यक आहे. यासाठी घरगुती पाण्याचे उघडे साठे जसे हौद, बॅरल, ड्रम, रांजण, माठ, फुलदाण्या, वॉटर कुलर, फ्रिजचा ड्रिप पॅन यामधील पाणी, विहिर, गच्चीवरील पाण्याच्या उघड्या टाक्या, जमिनीतील हौद, बागेतील हौद, टाक्यांच्या गळतीमुळे साचणारे पाणी, गच्चीवर व ड्रेनेज वाहिन्यांमध्ये साठलेले पाणी, घराच्या परिसरातील भंगार सामान, टायर, रिकाम्या बाटल्या, डबे, नारळाच्या करवंट्या, झाडांच्या कुंड्या, झाडांच्या ढोली यात साठणारे पाणी, तुंबलेली गटारे, गावाशेजारील नदी किंवा ओढा यातील साठलेले पाणी, सेफ्टीक टँक, इमारतींचे बेसमेंट येथे डासोत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी साचलेले पाणी फेकून एक दिवस कोरडा पाडावा, तसेच स्वच्छ पाणी प्यावे, परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.