उद्योगाचे नाव प्रदूषणाचे गाव : अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनाच ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 11:41 AM2022-05-02T11:41:52+5:302022-05-02T11:47:54+5:30
कंपनी जाणूनबुजून प्रदूषण नियमांचे उल्लंघन करीत आहे. यामुळे आजूबाजूच्या वातावरणाला गंभीर इजा होत असल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिशीत ठेवला आहे.
राजेश भोजेकर/आशिष देरकर
गडचांदूर (जि. चंद्रपूर) : प्रत्येक उद्योगाला शासनाने नियमावली घालून दिलेली आहे. ती पाळली जाते वा नाही, यासाठी विविध स्तरावर प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहेत. अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाच्या माणिकगड युनिटमध्ये याउलट बघायला मिळते. ही कंपनी प्रदूषण नियंत्रण नियमांनाच ठेंगा दाखवत आहे. याचा साक्षात्कार खुद्द महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाच झाला आहे.
अल्ट्राटेक सिमेंट उद्योगानेे अलीकडेच माणिकगड सिमेंट कंपनी खरेदी केली आहे. माणिकगडचे अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाचे माणिकगड युनिट असे संबोधले जाते. या युनिटकडून होणाऱ्या जीवघेण्या प्रदूषणाबाबत गडचांदुरातील नागरिकांनी कृती समिती स्थापन केली. तसेच प्रदूषण हटाव म्हणून स्वाक्षरी मोहीमही राबविली. ही तक्रार प्राप्त होताच प्रदूषण नियंत्रण मंडळही खडबडून जागे झाले. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी थेट कंपनी गाठली. वायू, जल, ध्वनी असे तिन्ही प्रकारचे प्रदूषण ही कंपनी करीत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले. तेव्हा कुठे कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली. कंपनी जाणूनबुजून प्रदूषण नियमांचे उल्लंघन करीत आहे. यामुळे आजूबाजूच्या वातावरणाला गंभीर इजा होत असल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिशीत ठेवला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळानेच बघितली नियमांची ऐशीतैशी
गडचांदूर शहरालगत असलेल्या युनिट-२ मध्ये क्लिंकर स्टोरेज क्षेत्रातून प्रचंड धुळीचे उत्सर्जन.
लोडिंग करणाऱ्या कामगारांच्या हालचालींदरम्यान क्लिंकर कोणत्याही शेडशिवाय अवैज्ञानिक पद्धतीने उघड्यावर.
कन्व्हेयर बेल्टवर विविध ठिकाणी गळती. परिणामी जड बेल्टमधून प्रचंड प्रमाणात धुळीचे उत्सर्जन.
सिमेंट कंपनी ते कन्व्हेयर बेल्टच्या ट्रान्सफर पॉइंटवर प्रदान केलेले बॅग फिल्टर नियमानुसार नाहीत. परिणामी प्रचंड सिमेंटची धूळ कन्व्हेयर बेल्टच्या खाली जमा.
युनिट क्रमांक १ ते युनिट क्रमांक २ पर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात सिमेंटची धूळ. रस्त्यावर पाणी मारण्याची कोणतीही व्यवस्था नाही.
वनस्पती क्षेत्रासह संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य.
कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने क्लिंकर विभागाजवळ काँक्रीटचा रस्ताच नाही. परिणामी रस्त्यावर प्रचंड प्रमाणत धूळ.
क्लिंकर स्टोरेजच्या शेडवर सिमेंटची प्रचंड धूळ.
फ्लाय ॲश सायलोच्या वरच्या भागातून जड धूळ उत्सर्जन.
बॅग फिल्टर आहेत, ते प्रभावी नाहीत.
दोन्ही युनिटच्या कन्व्हेयर बेल्टच्या सर्व संरचनांवर लॅटराइट पावडर जमा.
कच्च्या मालाच्या सायलोपासून भट्टीपर्यंत धूळ उत्सर्जन.
प्लास्टिक (एएफआर) असलेला पुरातन कचरा आवारात उघड्यावर.
पॅकेजिंग विभागात सिमेंटच्या धुळीचा जाड थर. ज्यामुळे धुळीचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन.