महावितरण कंपनीने जिल्ह्यातील वीज खंडित करणे थांबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:31+5:302021-07-27T04:29:31+5:30
चिमूर : कोरोनाचा संकटकाळ सुरू असतानाच पीक हंगाम व शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने चंद्रपूर ...
चिमूर : कोरोनाचा संकटकाळ सुरू असतानाच पीक हंगाम व शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तेव्हा वीज विभागाने ग्रामीण भागातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकारास स्थगिती देण्याची मागणी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
राज्यात सर्वांत जास्त वीजनिर्मिती करणारा चंद्रपूर जिल्हा असताना जिल्हावासीयांना वीजनिर्मितीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो, तर ग्रामीण भागात पाहिजे तसा रोजगार नसल्याने नागरिक अडचणीत आहेत. त्यामुळे अनेकांचे वीज बिल बाकी आहे. मात्र, विद्युत विभागाने कोरोनाकाळाचाही विचार न करता वीज खंडित करण्याचा सपाटा सुरू केलेला आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्र ग्रामीण भागात येत असून, या भागात औद्योगिक कारखान्यांचा अभाव असल्याने या परिसरातील नागरिकांचे अर्थचक्र शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जातच जगत आहे. चंद्रपूर जिल्हा हा वनव्याप्त व हिंसक जनावरांच्या छायेत असल्याने रात्रीला ग्रामपंचायतीच्या विद्युत खांबावरील वीजपुरवठा बंद झाल्यास बरीच हिंसक जनावरे स्थानिक नागरिकांवर हल्ले करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्य शासनाने कोरोना काळात अत्यल्प उत्पन्नामुळे वीज बिल न भरणाऱ्यांची घरगुती वीज खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम थांबविण्याची भांगडिया यांची मागणी आहे.