मोबाईल अॅपवर महावितरणच्या बिलिंग एजंटची कार्यशाळा
By admin | Published: July 30, 2016 01:29 AM2016-07-30T01:29:14+5:302016-07-30T01:29:14+5:30
महावितरण मोबाईलवर ग्राहकोपयोगी, असे मोबाईल अॅपसुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरविणे सुरू करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांचाही सहभाग : वीज कंपनीने विकसित केले तंत्रज्ञान
चंद्रपूर : महावितरण मोबाईलवर ग्राहकोपयोगी, असे मोबाईल अॅपसुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरविणे सुरू करण्यात आले आहे. त्यावर कार्यशाळा घेण्यात आली.
विजेसंबंधीच्या सेवा ग्राहकांना सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महावितरणच्याच माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारा ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अॅप, नवीन कनेक्शन अॅप, टीटर रीडिंग अॅप, कर्मचारीमित्र अॅप, लोकेशन कॅप्चर अॅप या चार मोबाईल अॅपचा वापर महावितरणच्या कर्मचारी व अभियंत्याद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळेचे आयोजन गडचिरोली मंडळ, चंद्रपूर मंडळ, वरोरा विभाग, चंद्रपूर विभाग तसेच इतर विभागातही करण्यात आले. चंद्रपूर येथे झालेल्या कार्यशाळेस मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी स्वत: मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता हरीश गजबे उपस्थित होते. चंद्रपूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अर्चना घोडेस्वार व प्रणाली विश्लेषक पंकज साठोने यांनी मोबाईल अपच्या वापराबद्दल सखोल माहिती व प्रशिक्षण दिले. कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अॅप, नवीन कनेक्शन अॅप, मीटर रिडिंग अॅप, कर्मचारीमित्र अॅपया सर्वांची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अॅप
महावितरणच्या अभियंते व जनमित्रांना त्यांच्या कामासाठी फिरावे लागते आणि सर्वेक्षण करावे लागते. फिल्डवर काम करताना अनेक महत्त्वाच्या नोंदी करावयाच्या असतात. आता या नोंदी कागदावर न करता थेट मोबाईल अॅपमधून केल्याने वेळेची व श्रमाची बचत होणार आहे.
नवीन कनेक्शन अॅप
उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील सर्व कनेक्शन या अॅपद्वारे देता येतात. सर्वेक्षणानुसार किती पोल व वायरची गरज आहे. मिटर क्रमांक आदी नोंदवता येतो. तांत्रिक कारणांमुळे एखादे कनेक्शन देता येत नसेल तर त्याचे सबळ कारण अॅपमध्ये नोंदवावे लागेल. तसेच अभियंत्यास त्याच्या क्षेत्रातील प्रलंबित कनेक्शनची संख्याही त्यात दिसेल.
मीटर रिडिंग अॅप
हे अॅप जनमित्रांसह रीडिंग घेणाऱ्या एजन्सीसाठीही उपयुक्त आहे. रिडिंगचा फोटो काढून अॅपपवर लोड करावा लागतो. मोबाईलद्वारेच हे काम होत असल्याने वेगळ्या कर्मचाऱ्यांची गरज पडणार नाही. आॅपरेटर व अभियंते त्यांच्याकडील फीडर, रोहित्र व ग्राहकांचे मीटर रीडिंग या अॅपद्वारे करु शकतील. मिटर रिडींग घेताना अक्षांश-रेखांशासह लोकेशन नोंदवले जात असल्याने रिडींगसाठी प्रत्यक्ष जाणे आवश्यक असणार आहे.
कर्मचारी मित्र अॅप
तातडीच्या तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद करणे आवश्यक असल्यास शाखा अभियंता त्याची नोंद अॅपपमध्ये करेल. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे, त्यांना मोबाईल संदेश पाठविण्याचीही सोय अॅपमध्ये केली आहे. वीज बंद ठेवण्याचे नेमके कारण समजल्यामुळे ग्राहकांचा रोष कमी होण्यास मदत होईल. त्यामध्ये भार व्यवस्थापन, लोकेशन कॅप्चर, फीडर रीडिंग प्रभावीपणे करता येईल.
लोकेशन कॅप्चर अॅप
या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांची रीडींग घेणाऱ्यास त्या ग्राहकाच्या भौगोलिक स्थानाचा तंतोतंत पत्ता, त्यांच्या शाखा कार्यालयाचा पत्ता, त्याचे विभागीय कार्यालय कोणते आहे आदी माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे.