महावितरणचा शाॅक, उशिरा मीटर रीडिंग घेण्याचा वीज ग्राहकांना बसतोय फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:28 AM2021-07-29T04:28:08+5:302021-07-29T04:28:08+5:30
जिल्ह्यात थर्मल पाॅवर स्टेशन तसेच अन्य उद्योग असल्यामुळे प्रदूषण तसेच अन्य समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो. यामुळे ग्राहकांना दोनशे ...
जिल्ह्यात थर्मल पाॅवर स्टेशन तसेच अन्य उद्योग असल्यामुळे प्रदूषण तसेच अन्य समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो. यामुळे ग्राहकांना दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची मागणी केली जात आहे. विशेषत: येथील आमदार किशोर जाेरगेवार यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांना तसे
आश्वासनही दिले आहे; मात्र अद्यापपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही;मात्र ग्राहकांच्या हातात येणारे बिल दर महिन्यात वाढूनच येत असल्याने ग्राहकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. विशेषत: उशिरा रीडिंग तसेच बिल वाटपात होणारा विलंब यामुळेही अनेक सामान्य ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सध्यस्थितीत जिल्ह्यात ५ लाखांवर घरगुती वीज ग्राहक आहेत.
बाॅक्स
महावितरणचे ग्राहक घरगुती-४६८८५२
कृषी-५५७२४
औद्योगिक-५२०८
व्यावसायिक-३११८७
बाॅक्स
१०० युनिट
पहिल्या शंभर युनिटला ग्राहकांना ३.४४ रुपये इतके वीज बिल आकारले जाते. घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना शक्यतो शंभर ते दोनशे युनिटपर्यंत वीज बिल येते.
बाॅक्स
१०१ ते ३०० युनिट
वीज युनिटच्या वापरानुसार ग्राहकांना वीज बिल दिले जाते. १०१ ते ३०० युनिटपर्यंत ७ रुपये ३४ पैसे प्रति युनिट वीज बिल आकारणी केली जाते.
बाॅक्स
३०१ युनिटपुढे
३०१ ते पुढील युनिटसाठी ग्राहकांना १० रुपये ३६ पैसे इतका दर आकारला जातो. यासोबतच बिलामध्ये इतरही सेवेबद्दल आकारणी केली जाते. ५०० युनिटच्या पुढे रीडिंग गेल्यास यामध्ये आणखी वाढ होते.
बाॅक्स
अशा आहेत तक्रारी
दर महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये रीडिंग घेतली जाते; मात्र काहीवेळा रीडिंग घेतले नाही तरी सरासरी वीज युनिट जोडले जाते. सरासरी घेतल्यानंतर मात्र ग्राहकांना वीज कार्यालयात चकरा माऱाव्या लागतात.
वीज ग्राहक हे शहरी आणि ग्रामीण भागातील आहेत. अशावेळी आता ऑनलाईनद्वारे प्रत्येक कामांना प्राधान्य दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांना सेतू केंद्राचा तसेच बाहेरील व्यक्तींचा आधार घ्यावा लागत आहे. यात त्यांना अतिरिक्त पैसा खर्च करावा लागत आहे.