ताडोबा सफारीला जाणाऱ्या मुंबईतील पर्यटकांच्या वाहनाला रानडुक्कर आडवे आल्याने अपघात
By राजेश भोजेकर | Updated: April 19, 2025 15:39 IST2025-04-19T15:38:47+5:302025-04-19T15:39:54+5:30
Chandrapur : चार पर्यटक किरकोळ जखमी; वाहनाच्या धडकेत रानडुक्कर जागीच ठार

Mumbai tourists on their way to Tadoba safari meet with accident after wild boar hits vehicle
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा जंगल सफारी करण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या खासगी वाहनासमोर अचानक जंगलीडुक्कर आडवे आले. रानडुकराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. अशातच वाहन रानडुकराला जोरदार धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडावर धडकले. या अपघातात वाहनातील एका पर्यटकाच्या हाताला गंभीर मार लागला तर अन्य तीन पर्यटक किरकोळ जखमी झाले. धडक इतकी भीषण होती की यामध्ये रानडुक्कर जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी (दि.१९ रोजी) सकाळी ६ वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन क्षेत्रातील गोंडमोहाळी फाट्याजवळ घडली. जखमींमध्ये योगेश कमलिया (३३), दीक्षा जया शेट्टी (३४), धीरज हेगडे (३२) व नमिता छाभरा (३४ ) हे सर्व रा. मुबंई यांचा समावेश आहे. या प्रकरणी वनविभागाने वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 2 (16) C 9 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अपघातग्रस्त वाहन जप्त केले आहे.
ताडोबा बफर झोन क्षेत्राच्या सफारीसाठी मुंबईहून आलेले चार पर्यंटक गोंडमोहाळी फाट्याजवळील एका खासगी रिसाेर्टवरून सकाळच्या सफारीसाठी स्वतः आपल्या चारचाकी वाहनाने (एचएच ४८ एटी ०५६६) शिरकाळा बफर जंगलात सफारीसाठी जात होते. रस्त्यात गोंडमोहाळी फाट्याजवळ एक रानडुक्कर सुसाट वेगाने वाहनासमोर आल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. अशातच त्या रानडुकराला वाहनाची जोरदार धडक बसली. यानंतर वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पळसाच्या झाडावर धडकले. यामध्ये वाहनातील एका पर्यटकाच्या हाताला गंभीर मार लागला. इतर पर्यटक किरकोळ जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णलयात भरती करण्यात आले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.