बल्लारपुरात सुधीर मुनगंटीवारांचे राजकीय पक्षांपुढे तगडे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:49 AM2019-10-01T11:49:22+5:302019-10-01T11:49:46+5:30
राज्याचे अर्थ व नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तिसऱ्यांदा बल्लारपूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. अधिकृत घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक आहे.
राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थ व नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तिसऱ्यांदा बल्लारपूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. अधिकृत घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक आहे. गेल्या ६० वर्षांत कधीही न पाहिलेला विकास त्यांनी अवघ्या पाच वर्षांत या मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात करून दाखविला. या विकास कामांवरच ना. मुनगंटीवार यांची मतदार अन्य उमेदवारांसोबत तुलना करणार असे चित्र आहेत. मुनगंटीवारांनी विकासकामे करून उभे केलेले हिमालयासारखे आव्हान काँग्रेस व अन्य राजकीय पक्ष कसे पेलतील, याकडे जनतेचे लक्ष लागले आहेत.
बल्लारपूर विधानसभा मतदार संघ २००४ पर्यंत सावली या नावाने ओळखला जायचा. २००९ मध्ये सावली तालुका वगळून बल्लारपूर, मूल आणि पोंभूर्णा तालुक्यासह चंद्रपूर तालुक्याचा काही भाग मिळून या मतदार संघाची निर्मिती झाली. सावली मतदार संघावर १९६२ ते १९८५ पर्यंत २२ वर्षे सलग काँग्रेसची सत्ता होती. १९९० पासून या मतदार संघावर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले. बल्लारपूर मतदार संघाच्या निर्मितीपासून सुधीर मुनगंटीवार प्रतिनिधित्व करीत आहेत. ते राज्याचे हेवीवेट मंत्री असल्याने राज्यभर हा मतदार संघ त्यांच्या नावाने ओळखला जातो. गेल्या पाच वर्षांत जी विकासकामे मंत्रालयात मंजूर झाली, त्यातील बहुतेक विकासकामे बल्लारपूर मतदार संघातही आली. या पलीकडे जावून या मतदार संघाचा आमदार या नात्याने ना. मुनगंटीवार यांनी केलेली विकासकामे जनतेला मूर्तरुपात दिसत आहेत. मतदार संघातील एकही व्यक्ती विकासापासून वंचित राहू नये, या दृष्टीकोनातून त्यांनी या क्षेत्रात कामे केली आहेत. केवळ आश्वासने न देता दिलेला शब्द नियोजित वेळेतच त्यांनी पूर्ण केला. ही कामे करताना त्यांचं या मतदार संघावर असलेलं प्रेमही प्रतिबिंबित झालं आहे. येथील जनतेशी त्यांची नाळ जुळलेली असल्याचे अनेकवार सिद्ध झाले आहेत. मुंबईतून दौरा निघाल्यास त्यामध्ये मतदार संघात एकतरी भूमिपूजन वा लोकार्पणाचा कार्यक्रम नाही असे कधीही झाले नाही. ही विकासकामे करताना समाजिक आरोग्य जपण्याच्या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसारखा धाडसी निर्णय घेतला. दारूबंदीचे अनेक चांगले परिणाम आता बघायला मिळत आहे.
टुंबातील वादविवाद कमी झाले आहे.
दारू दुकानासमोरून जाताना बघायला मिळणाऱ्या तंटेभांडणामुळे महिलांसह जनतेला होणारा त्रास संपुष्टात आला. अवैध मार्गाने दारू मिळत असली तरी अनेकांनी दारूचा त्याग केला आहे. हे नाकारता येणारे नाही. असे असताना एका वर्गातून दारूबंदीला टोकाचा विरोध झाला. विरोध करणाऱ्यांचा चेहरा काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईनंतर जनतेपुढे आला. यामुळे दारूबंदी उठविण्याच्या मागणीतील हवाच निघाली. यामुळे या मतदार संघाच्या निवडणुकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आव्हान अन्य राजकीय पक्षांसाठी हिमालयासारखे मोठे झाले आहे. या मतदार संघात काँग्रेस हा तुल्यबळ पक्ष असून त्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी, बसपाही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. काँग्रेसकडून चंद्रपूरचे डॉ. विश्वास झाडे यांच्या नावाची चर्चा असून अधिकृत घोषणेची वाट आहे.
बीआरएसपीतून बाहेर पडलेले राजू झोडे यांचादेखील काँग्रेसच्या तिकिटावर डोळा आहे. वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूरच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नावाची चर्चा आहेत. पुढल्या दोन दिवसांत उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. यानंतरच येथील खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.