मनपा क्षेत्रात १९ हजार ५६६ रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:36+5:302021-05-15T04:26:36+5:30
महानगरपालिका हद्दीत मागील आठवड्यात ८० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात होते. अनेकांच्या घरी रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. झोपडपट्टी परिसरात बिकट स्थिती ...
महानगरपालिका हद्दीत मागील आठवड्यात ८० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात होते. अनेकांच्या घरी रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. झोपडपट्टी परिसरात बिकट स्थिती आहे. अशावेळी कोविड संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे गृहविलगीकरणातील रुग्णसंख्या ४० टक्क्यांवर आणण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या.
राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका अंमलबजावणी करीत आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची अँटिजेन चाचणी, विनामास्क फिरणाऱ्यावर दंड, निर्बंधानंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्यावर कारवाई, व्यापक लसीकरण मोहीम यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत.
एप्रिलअखेर ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ४,४६८ इतकी होती. ती १३ मेपर्यंत ३,१५८ पर्यंत कमी झाली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे.
मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.