कर चोरीवर मनपा आयुक्तांची टाच
By admin | Published: July 16, 2014 12:04 AM2014-07-16T00:04:56+5:302014-07-16T00:04:56+5:30
येथील मनपाचे नवे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी आल्याआल्या कर चोरीवर टाच घालण्याचा प्रयत्न करून आपल्या कामाची ‘स्टाईल’ मंगळवारी दाखवून दिली.
प्रभारी कर पर्यवेक्षकाचे निलंबन : प्रतिष्ठित डॉक्टरच्या इमारतीसाठी दिलेल्या परवानगीत घोळ
चंद्रपूर : येथील मनपाचे नवे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी आल्याआल्या कर चोरीवर टाच घालण्याचा प्रयत्न करून आपल्या कामाची ‘स्टाईल’ मंगळवारी दाखवून दिली.
शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर कुबेर कोतपल्लीवार यांच्या व्यावसायिक इमारतीसाठी परवानगी देताना कर चोरीला पाठबळ देण्याचा आरोप ठेवून मनपातील प्रभारी कर पर्यवेक्षक ए.एम.बेग यांना त्यांनी तडकाफडकी निलंबित केले. यामुळे मनपात खळबळ उडाली आहे.
ए.एम. बेग हे कर विभागात वरिष्ठ लिपिक असून बरेच दिवसांपासून प्रभारी कर पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. एखाद्या विभाग प्रमुखाला निलंबित करण्याची ही मनपातील पहिलीच वेळ असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. डॉ. कुबेर कोतपल्लीवार यांचे निवासस्थान, नर्सिंग होम आणि मेडिकल स्टोअर्स असलेल्या इमारतीच्या कर चुकवेगिरीवरुन हे प्रकरण घडले आहे.
या प्रकरणी सुधीर शंभरकर यांना विचारणा केली असता, त्यांनी निलंबनाला दुजोरा दिला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी डॉ. कुबेर यांचे सर्व सुविधायुक्त असलेल्या १०० खाटांच्या रूग्णालयाचे एक पत्रक आपणास मिळाले होते. त्यावरून आपली ुउत्सुकता जागविल्याने या इमारतीची फाईल कर विभागातून मागविली. त्यात, २००२-०३ पासून केवळ निवासी इमारतीपोटी कर वसूल केल्याचे निदर्शनास आले.
व्यावसायिक कर आकारणी का नाही, या संदर्भात कर विभागाचे पर्यवेक्षक बेग यांना विचारणा केली. निवासी इमारतीचे व्यावसायिक इमारत दर्शविण्याचे का टाळले याचे उत्तर तीनवेळा संधी देवूनही बेग समाधानकारक देऊ शकले नाहीत.
यात टाळाटाळ होत असल्याचे आणि जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचे निदर्शनास आल्याने निलंबनाचा निर्णय घेण्यात आला, असे शंभरकर यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)