विकास आराखड्यासाठी मनपा समिती नेमणार
By admin | Published: November 20, 2014 10:49 PM2014-11-20T22:49:53+5:302014-11-20T22:49:53+5:30
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपाच्या आढावा सभेत केलेल्या सूचनेवरून शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी समिती नेमण्याचा ठराव आज गुरुवारी झालेल्या आमसभेत
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपाच्या आढावा सभेत केलेल्या सूचनेवरून शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी समिती नेमण्याचा ठराव आज गुरुवारी झालेल्या आमसभेत पारित करण्यात आला. फेब्रुवारीपर्यंत हा आराखडा तयार केला जावा, असा निर्णयही या सभेत घेण्यात आला.
महानगरपालिकेच्या आमसभेत आज गुरुवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार होत्या. महानगरपालिका झाल्यानंतरही अडीच वर्षात चंद्रपूरचा पाहिजे तसा विकास झाला नाही. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहराच्या मुख्य समस्या सोडविणारा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आजच्या आमसभेत यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. शहर विकास आराखडयासाठी एम समिती नेमण्याचा निर्णयही घेण्यात आला.
यापूर्वी कचरा उचलण्याचे कंत्राट देऊनही शहरातील केरकचरा साफ होऊ शकला नाही. त्यामुळे घराघरांतून कचरा संकलन करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन होता. आज यावर चर्चा करण्यात आली. यानंतर डोअर टू डोअर घंटागड्या जाईल व घराघरातून कचरा संकलन केला जाईल. या कामाचे खासगी कंपनीला कंत्राट देण्याचा ठरावही आज पारित करण्यात आला. विशेष म्हणजे, यापुढे सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर आळा बसविण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. एखाद्या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी घाण करताना आढळला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई करण्याचे अधिकारी मनपा कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यासोबतच एलबीटीपासून व्यावसायिकांना तुर्तास सूट नसल्याचे आजच्या सभेत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे एलबीटी व्यावसायिकांना भरावाच लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)