महानगरपालिका भ्रष्टाचाराने बरबटली
By admin | Published: July 16, 2014 11:59 PM2014-07-16T23:59:34+5:302014-07-16T23:59:34+5:30
मनपाच्या आमसभेत एखाद्या विषयाला बहुसंख्य नगरसेवकांनी कडाडून विरोध केला तरी मनपाचे पदाधिकारी आपल्या सोईनुसार प्रोसेडींग बुकमध्ये ठराव लिहितात. आपल्या स्वार्थासाठी जनतेचे
चंद्रपूर : मनपाच्या आमसभेत एखाद्या विषयाला बहुसंख्य नगरसेवकांनी कडाडून विरोध केला तरी मनपाचे पदाधिकारी आपल्या सोईनुसार प्रोसेडींग बुकमध्ये ठराव लिहितात. आपल्या स्वार्थासाठी जनतेचे अहित करून कंत्राटदारांना मदत केली जाते. एकूणच महापालिकेचा कारभार आता भ्रष्टाचाराने बरबटला आहे, असा आरोप खुद्द सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांनीच केला आहे. या संदर्भातील एक तक्रार त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
३० जूनच्या आमसभेत विषय क्रमांक २९ वर रिलायन्स जीओला खोदकाम करण्यास परवानगी देणे, टॉवर्स उभारण्याला परवानगी देणे या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेस, भाजपा व इतर पक्षाच्या ५० ते ५५ नगरसेवकांनी रिलायन्स जीओला परवानगी देण्याला विरोध दर्शविला. असे असताना प्रोसेडींग बुकमध्ये रिलायन्स जीओला मदत करण्यासाठी ठराव चुकीच्या पध्दतीने लिहिण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे गटनेता प्रशांत दानव, नगरसेवक प्रविण पडवेकर, अशोक नागापुरे यांनी केला आहे.
असा प्रकार पहिल्यांदाच झाला नसून अनेकदा सर्वसाधारण सभेत चर्चा एक होते आणि महापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून प्रोसेडींग बुकमध्ये वेगळ्या पध्दतीने लिहिण्यात येते. रिलायन्स जीओचे टॉवर्स रहिवासी भागात, शाळा-महाविद्यालय व दवाखान्याच्या परिसरात उभारल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात, हे जगाला माहित आहे. नागरिक रस्ते, वीज, ड्रेनेज सिस्टीम, सिव्हरेज सिस्टीम, स्वच्छता या गोष्टीसाठी नगरसेवकांना निवडून देतात. शासनही नागरिकांच्या विविध कराच्या रकमेचा त्यांच्या सुविधांसाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने आयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करते. अशावेळी सभेत बहुमतात जो ठराव घेण्यात येतो, त्याला मंजुरी देणे अपेक्षित आहे. मात्र बहुमताच्या बाजूने न जाता महापौर व इतर पदाधिकारी नगर सचिवांवर दबाव आणून चुकीच्या पध्दतीने प्रोसेडींगमध्ये ठराव लिहित आहे.
असा प्रकार दखलपात्र गुन्हा असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे व्हीडीओ रेकॉर्र्डींग पाहून सभेत जे घडले तेच बुकमध्ये लिहावे व जनहित याचिकेवर न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत शहरात मोबाईल टॉवर्स उभारू नये, अशी मागणीही पडवेकर, दानव व नागापुरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)