चार बांधकामांवर महापालिकेने चालविला हातोडा: चंद्रपूर अवैध बांधकाम वाढले
By साईनाथ कुचनकार | Published: May 19, 2023 06:40 PM2023-05-19T18:40:09+5:302023-05-19T18:40:16+5:30
सक्तीने कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश, तक्रारीनंतर अतिक्रमण विभागाची कारवाई.
चंद्रपूर :चंद्रपूर महानगरपालिकेने अवैध बांधकामावर कारवाई केली असून कोनेरी तलाव, बाबूपेठ व नागपूर रोड येथील एकूण चार बांधकामे जेसीबी व अतिक्रमण पथकाच्या मदतीने काढण्यात आली. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये चंद्रपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे आता या अतिक्रमणावरही मनपा हातोडा चालविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोनेरी तलावाजवळील जेलच्या मागील परिसरात गफ्फुर वल्द शेख अलमुद्दीन यांचे अवैध बांधकाम, हुडको कॉलनी बाबूपेठ येथील चरण पोरटे यांचे पहिल्या माळ्यावरील बांधकाम, सुरेश डाबरे यांच्या मालकीचे टिनाच्या शेडचे व बाथरूमचे बांधकाम तसेच नागपूर रोडवरील अमित व अभिषेक येरगुडे यांच्या २ मजली इमारतीचे अंदाजे क्षेत्रफळ १ हजार शंभर चौरस फुटाच्या अवैध बांधकामासंदर्भात महापालिकेकडे तक्रार आली होती.
त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, बांधकाम अवैधरीत्या केल्याचे आढळून आले. त्यामुळे अतिक्रमणधारकांना मनपा कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ अन्वये नोटीस देऊन बांधकाम स्वतःहून हटविण्याविषयी सूचना देण्यात आल्या. परंतु अवैध बांधकामधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे पोलिस पथकाच्या संरक्षणात बांधकाम काढले.
ही कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त सचिन माकोडे, नरेंद्र बोभाटे, सहायक नगर रचनाकार सारिका शिरभाते, राहुल भोयर, आशिष भारती यांनी केली. यावेळी मनपा अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सक्तीने कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश
शहरातील अवैध बांधकामाची वाढती प्रकरणे बघता, आयुक्त विपीन पालीवाल यांनी अशा बांधकामांवर सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने तिन्ही प्रभागाचे सहायक आयुक्तांनी कार्य सुरू केले आहे. अवैध बांधकाम - अतिक्रमणावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे.