टक्केवारी, भागीदारी, दादागिरीवर महापालिकेचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:13+5:302021-08-01T04:26:13+5:30
प्रत्येक कामामध्ये टक्केवारी, अनेक कामांमध्ये भागीदारी तसेच काम मिळविण्यासाठी दादागिरी ही नवीन प्रथा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेली आहे. ...
प्रत्येक कामामध्ये टक्केवारी, अनेक कामांमध्ये भागीदारी तसेच काम मिळविण्यासाठी दादागिरी ही नवीन प्रथा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेली आहे. पदाधिकाऱ्यांच्या अशा कारभारामध्ये अनेक भ्रष्ट अधिकारीसुद्धा हातात हात घालून सामील आहेत. यामुळे भरमसाट मालमत्ता कर देणाऱ्या चंद्रपूरकरांच्या तसेच शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत आहे, असा आरोपही यावेळी केला.
दि. २९ जुलै रोजी झालेल्या ऑनलाईन सभेमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने विरोधी पक्षातील काही नगरसेवक तसेच सत्ताधारी पक्षाचे समर्थक असलेल्या एका नगरसेवकावर कारवाई करण्यात आली. या सभेमध्ये पीठासीन अधिकारी महापौर राखी कंचर्लावार यांनी विरोधकावर नेमप्लेट व पाण्याची बाटली फेकून लोकशाहीत एक नवीन पायंडा सुरू केला. पीठासीन अधिकाऱ्यांसोबत बसलेले उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांनीसुद्धा खाली उतरून विरोधकांना अश्लील शिवीगाळ करणे, त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणे अशी गंभीर कृत्ये केली. महापौरांचे पती असलेले नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. महानगरपालिका अधिनियमांतील कलम १२ नुसार या सदस्यांची वर्तणूक गंभीर स्वरूपाची आहे. तरीही आजपावेतो आयुक्त राजेश मोहिते यांनी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. सभागृहात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पीठासीन अधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांना आयुक्त राजेश मोहिते कोणत्या आधारावर कारवाईतून सूट देत आहेत, असा सवालही यावेळी केला.