मनपाची दोन कोटींची तरतूद कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:33 PM2018-07-14T22:33:00+5:302018-07-14T22:33:26+5:30
शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या हेतूने दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. परंतु योजनांचा आराखडा तयार करून निधी खर्च करण्याच्या कार्यवाहीला अद्याप गती मिळाली नाही. त्यामुळे दुर्बल घटकांमध्ये नाराजी पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या हेतूने दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. परंतु योजनांचा आराखडा तयार करून निधी खर्च करण्याच्या कार्यवाहीला अद्याप गती मिळाली नाही. त्यामुळे दुर्बल घटकांमध्ये नाराजी पसरली आहे.
शहरातील अनेक प्रभागामध्ये आर्थिक मागासवर्गीय समाजाची संख्या बरीच आहे. या प्रभागात रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि सामाजिक न्याय विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी मनपाने आर्थिक तरतूद करणे नियमानुसार बंधनकारक आहे. त्यानुसार २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात दोन कोटींची तरतूद करण्यात आली. या निधीतून विविध विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन मनपाने केले होते. बाबूपेठ, तुकूम, बंगाली कॅम्प, जलनगर आदींसह अन्य वॉर्डांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबाची संख्या सर्वात मोठी आहे. त्यामुळे विकासाची कामे प्राधान्याने सुरू करण्याची ग्वाही मनपातील सत्ताधाऱ्यांनी दिली होती. परंतु, अर्थसंकल्पातील प्रस्तावित कामे सुरू झाली नाही, असा आरोप आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिक करीत आहेत. सामाजिक न्यायाच्या विविध योजनांनाही चालना मिळाली नसल्याचे गरजू लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. शहरातील महिला व बालकांच्या कल्याणाची जबाबदारी पूर्ण करण्याचे आश्वासने मनपाने दिले होते. त्यानुसार २०१८-१९ वर्षाकरिता महिला व बालकांच्या विश्रामगृहासाठी ९० लाख, बालोद्यानासाठी ९० लाख व इतर सुविधांसाठी दोन कोटी असे एकूण तीन कोटी ९३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पण ही कामे पूर्णत्वास आली नाहीत. दिव्यांग कल्याण योजनांसंदर्भातही हाच प्रकार घडल्याचा आरोप दिव्यांग संघटनेने केला. दिव्यांग कल्याणासाठी तयार केलेल्या धोरणानुसार मनपाने दोन कोटींची तरतूद केली आहे.
हेही महत्त्वाचे...
मनपाने शहरातील अनेक प्रभागात रस्ते व नाल्यांचे बांधकाम वेगाने करीत आहे. ही मोठी उपलब्धी असली तरी सामाजिक न्यायाच्या योजनांनाही विशेष प्राधान्य द्यावे, अशी मागणी गरजुंनी केली.
शहरातील मूलभूत कामे पूर्ण करा- राहुल पावडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दोन आठवड्यांपासून सतत पाऊस सुरू असल्याने शहरातील रस्ते, सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या, पूल व पथदिव्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूलभूत स्वरूपाची कामे तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी दिले. स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.
मुसळधार पावसामुळे शहरातील विविध प्रभागात निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना त्रास होवू नये, यासाठी अधिकाºयांनी कंत्राटदारांना कामाला लावावे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. काही ठिकाणी पाणी साचले. नाल्या चोकअप झाल्या. पथदिवेही बंद आहेत. अशा ठिकाणी साहित्याचा पुरवठा करून समस्या मार्गी लावावे. यासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही सभापती पावडे यांनी दिली.
अमृत योजनेअंतर्गत रस्त्याच्या कडेला गट्टू लावून स्वच्छता करावी. झोन क्र. १, २ व ३ मध्ये कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी सभेत दिले. यावेळी नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त बेहरे, उपायुक्त गोस्वामी, बोकडे व देवळीकर, नगर सचिव अ.फैज काझी उपस्थित होते.