विधानसभेच्या मतदार यादीनुसार मनपा निवडणूक
By admin | Published: September 17, 2016 01:33 AM2016-09-17T01:33:25+5:302016-09-17T01:33:25+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक २०१७ मध्ये होणार आहे. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत
संजय काकडे : पत्रकार परिषदेत दिली माहिती
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक २०१७ मध्ये होणार आहे. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत विधानसभा मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. यावर आधारित मतदार यादी मनपा निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त संजय काकडे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
१ जानेवारी २०१७ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकाने या कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे. नाव नोंदविले तरच त्याला आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मतदान करता येईल, असेही यावेळी आयुक्त काकडे यांनी स्पष्ट केले. पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज नमुना क्रमांक ६ भरावयाचा आहे. याकरिता महानगरपालिकेच्या सर्व शाळा, एफईएस महिला महाविद्यालय, छोटुभाई पटेल महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, सरस्वती महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, यशोधरा कॉलेज आॅफ फार्मसी, राजीव गांधी महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तुकूम, जैनुद्दीन जव्हेरी पॉलिटेक्नीक, विधि महाविद्यालय तुकूम, जनता महाविद्यालय, बजाज पॉलिटेक्नीक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नावाची नोंदणी करता येणार आहे. याशिवाय मनपाच्या सर्व झोन कार्यालयामध्येदेखील नोंदणी करता येईल, असेही काकडे यांनी सांगितले.
याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार आहे. बॅनर, होर्डिंग्ज, मोबाईलवर एसएमएस पाठविले जातील, अशी माहितीही संजय काकडे यांनी दिली. यावेळी उपायुक्त विजय इंगोले उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)