प्राचीन विहीर स्वच्छतेसाठी मनपाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:42 PM2018-09-25T22:42:52+5:302018-09-25T22:43:09+5:30
इको-प्रोद्वारा सुरु असलेल्या शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहिरी स्वच्छता अभियानास मंगळवारी शहर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी भेट दिली. तसेच विहिरी स्वछतेसाठी इको-प्रो सोबत मनपासुद्धा पुढाकार घेणार असल्याचे घोषणा करीत संबधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इको-प्रोद्वारा सुरु असलेल्या शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहिरी स्वच्छता अभियानास मंगळवारी शहर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी भेट दिली. तसेच विहिरी स्वछतेसाठी इको-प्रो सोबत मनपासुद्धा पुढाकार घेणार असल्याचे घोषणा करीत संबधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या.
इको-प्रोच्या ऐतिहासिक गोंडकालीन बावडी-विहिरी स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यास आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर यांनी बाबुपेठ येथील अभियान स्थळी विहिरीला भेट दिली. यासोबत हिंग्लाज भवानी मंदिर परिसरातील पायऱ्याच्या विहिरीची पाहणी केली. यावेळी या ऐतिहासिक विहिरीची आणि सुरु असलेल्या अभियानाची माहिती संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यानी दिली.
महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त देशात सुरु असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत इको-प्रो संस्थेने दुर्लक्षित असलेल्या शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहिरीची स्वच्छता करण्याचे अभियान १५ सप्टेंबरपासून सुरु केले होते. या अभियान अंतर्गत बाबुपेठ परिसरातील जवळपास ६० फुट अधिक खोल असणारी, तीन मजली पायºयाची विहिरीपासून सुरुवात करण्यात आली. सदर विहिर दुर्लक्षित असल्याने कचरा फेकण्याचे ठिकाण झाले होते. यावर मोठी-मोठी झाड़े उगवल्याने विहिरीची तुटफुट झाली होती. या अभियानामुळे आता या विहिरीची स्वच्छता आणि संवर्धनाची शक्यता वाढली आहे. तसेच या अभियानात आता पुढे महानगरपालिका पूर्णपणे सहभागी होणार असल्याने ऐतिहासिक विहिरीचे संवर्धनासोबत, जलस्त्रोत संवर्धन आणि स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने महानगरपालिकेचा पुढाकार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मत इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.
यावेळी आयुक्त काकडे यांना सदर विहिरी स्वच्छ केल्यानंतर येथे नागरिकांना पाणीपुरवठा व्यवस्था करण्याची, तसेच विहिरीला लोखंडी जाळी लावण्याची मागणी करण्यात आली.
अभियानस्थळी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, इको-प्रो पुरातत्व विभाग प्रमुख रवी गुरनुले, नितीन बुरडकर, बिमल शहा, अनील अदूरवार, राजू कहीलकर, कपिल चौधरी, प्रमोद मलिक, राजेश व्यास, सुनील पाटिल, मनीष गावंडे, अमोल उत्तलवार, पूजा गहुकर, आयुषी मुल्लेवार, सारिका वाकुडकर यांच्यासह इको-प्रोचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यटनास वाव मिळेल
महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांना इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी निवेदन देत अभियानाची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंगळवारी आयुक्त काकडे यांनी बाबुपेठ परिसरातील अभियानस्थळी भेट देत पाहणी केली. सदर विहिरी गोेंडकालीन जलस्त्रोतच नाही, तर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून पर्यटनदृष्ट्रया महत्वचा ठरणार आहे. शहरात अनेक ऐतिहासिक वारसा असून तो जपला जाणे गरजेचे आहे. तसेच जलस्त्रोताचे संवर्धन होणे गरजेचे आहे असे मत आयुक्त संजय काकडे यांनी व्यक्त केले. मागील अनेक दिवसांपासून इको- प्रोने शहरातील ऐतिहासिक वस्तूची स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. याबाबतबची दखल पंतप्रधानानी घेतली. त्यामुळे चंद्रपूरचे नाव सर्वत्र प्रचलीत झाले. परिणामी शहरातील पर्यटनाला वाव मिळेल, असे ते म्हणाले. तसेच अभियानात सहभागी सदस्यांचे त्यांनी कौतुक केले.