मनपा अधिकारी सायकलने कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 05:00 AM2020-12-19T05:00:00+5:302020-12-19T05:00:42+5:30
प्रत्येक शुक्रवारला कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतेही वाहन आणू नये व आणल्यास त्यांनी मनपा आवारात प्रवेश दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदर बाब वैयक्तिक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे व आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारीसह आपल्या सभोवतालच्या संबंधित किमान पाच लोकांना महत्व पटवून या अभियानाची व्याप्ती पाठविण्यास सहकार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आयुक्त राजेश मोहिते यांच्या पुढाकारात चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी शुक्रवारी सायकलने कार्यालय गाठले. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा २०२१ कार्यक्रम अंतर्गत प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आठवडयातून एक दिवस आपली दुचाकी व चार चाकी वाहनांचा वापर न करता सायकलने कार्यालयात येणे अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे सर्व मनपा अधिकारी, कर्मचारी सकाळी १० वाजताच्या सुमारास येथे प्रियदर्शनी चौक येथे एकत्र आले व तेथून सायकलने कार्यालयात येऊन मोहिमेची अंमलबजावणी केली.
माझी वसुंधरा अभियान २ आॅक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून लागू केले असून प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत, निर्सगाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्याकरिता हे अभियान सुरु केले आहे.
या अभियान कालावधीत पंचतत्वाला व मानवी जीवनाला सहकार्य होण्याच्या हेतुने दर शुक्रवारी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी सायकलने (यंत्र विरहित) कार्यालयात यावे असा निर्णय चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी घेतला होता.
याप्रसंगी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, शहर अभियंता महेश बारई, लेखाधिकारी संतोष कंधेवार,अंतर्गत लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, सर्व अभियंता, कर्मचारी स्वच्छता निरीक्षक यांनी सायकल अभियानात सहभाग नोंदविला.
दर शुक्रवारी आता सायकलच