आरक्षित भूखंडांचा मनपाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:06 AM2017-11-24T00:06:44+5:302017-11-24T00:07:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत शहर विकास आरखड्यानुसार अनेक भूखंड विविध गोष्टींसाठी आरक्षित करण्यात आले आहे. आरक्षित भूखंडांवर नियोजनाप्रमाणे कामे होऊ शकली नाही. त्यामुळे हे भूखंड अनेक वर्षांपासून मोकळे आहेत. आता या भूखंडांवर नागरिकांची वक्रदृष्टी पडली असून अनेक आरक्षित भूखंड गडप झाल्याची शक्यता आहे. मात्र याबाबत गंभीर नसलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे आजवर याचे ‘स्पॉट व्हेरीफिकेशन’ झाले नाही. त्यामुळे पुढे शहर विकासात मोठा अडथळा निर्माण होणार आहे.
कोणत्याही शहराचा विकास करताना योग्य पध्दतीने नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी शहर विकास करण्यापूर्वी नियोजन आराखडा तयार केला जातो. चंद्रपूर शहरासाठीही हा विकास आराखडा नगर रचना विभागाकडून तयार करण्यात आला. त्याला महापालिकेने २०१२ मध्ये मंजुरीही दिली आहे. या विकास आराखड्यानुसार शहर विकास होणे अपेक्षित असताना विकासकामात या आरखड्याला बगल दिली जात असल्याचे दिसून येते. यामुळे पुढे शहर विकासात मोठा अडथळा निर्माण होणारे हे स्पष्ट दिसत आहे.
नगरविकास आरखड्यानुसार प्रत्येक गोष्टींसाठी भूखंड आरक्षित केले जाते. त्यात दवाखाना, रस्ते, शाळा, क्रीडांगण, बगिचा आदींचा समावेश असतो. प्रत्येक लेआऊटमध्ये लेआऊटच्या क्षेत्राच्या १० टक्के जागा ओपनस्पेस म्हणून आरक्षित ठेवली जाते. मात्र चंद्रपुरातील अनेक लेआऊटमध्ये अशी आरक्षित जागा कुठेच दिसत नाही.
अशीच अवस्था क्रीडांगण व बगिच्यांची झाली आहे. चंद्रपुरातील ३३ प्रभागाचे क्षेत्र गृहित धरल्यास या शहरात किती बगिचे व क्रीडांगण असले पाहिजे, हे शहर विकास आराखड्यात नमूद असेलही; मात्र शहरात परिस्थिती भिन्न आहे. शहराचा पसरा बघता बागबगिचे व मुलांबाळांसाठी असलेले क्रीडांगणे कमी दिसतात. वास्तविक, या बाबींसाठी शहर विकास आराखड्यात भूखंड आरक्षित आहेत. मात्र नगरपालिका अस्तित्वात असतानापासून याकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे कुठल्याच वापरात नसलेले हे भूखंड नागरिकांकडून हळूहळू ताब्यात घेण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने व नगर रचना विभागाने या आरक्षित भूखंडांची गांभीर्याने चौकशी करणे आता गरजेचे झाले आहे.
आरक्षित जागा संपादनासाठी निधीच नाही
नागरिकांना शहरात बांधकामे करताना सार्वजनिक बाबींसाठी काही जागा आरक्षित ठेवावी लागते. जसे ले-आऊटनुसार रस्ते मंजूर असतात. रस्ता नागरिकांच्या मालमत्तेमधून जात असेल तर त्याच्या मालमत्तेतून रस्त्याची जागा मनपा आरक्षित ठेवते. या आरक्षणानंतरच बांधकामाला परवानगी दिली जाते. त्या जागेचा मोबदला मात्र मनपाला मालमत्ताधारकांना द्यावा लागतो. परंतु शहरातील असे आरक्षित भूखंड संपादित करण्यासाठी मनपाजवळ निधी नसल्याने हे भूखंड संपादित झालेच नाही. परिणामी नागरिकांनीही या आरक्षणावर बांधकामे केली आहेत.
दोन वर्षांत अंशत: बदल
मागील दोन वर्षात काही नवीन वस्त्यांमध्ये मोकळ्या जागेवर छोटेखानी क्रीडांगण तयार करून बालगोपालांसाठी खेळण्याचे साहित्य लावल्याचे दिसून येते. एकदोन ठिकाणी छोटेखानी बगिचेही तयार करण्यात आले आहे. मात्र या बगिच्यांची व्यवस्थित निगा राखली जात नसल्याने त्याचीही दूरवस्था होत आहे.