चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:07+5:302021-07-02T04:20:07+5:30

चिमूर, मासळ (चंद्रपूर) : दीड वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील एका विधवा महिलेचे तालुक्यातील मासळ (बु.) येथील व्यक्तीशी सोशल मीडियावरून सूत ...

Murder of wife on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

Next

चिमूर, मासळ (चंद्रपूर) : दीड वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील एका विधवा महिलेचे तालुक्यातील मासळ (बु.) येथील व्यक्तीशी सोशल मीडियावरून सूत जुळले. घरच्या मंडळींना विरोध करून तिने मासळ येथील तंटामुक्त समितीच्या माध्यमातून त्या व्यक्तीबरोबर प्रेमविवाह केला. यातून तिला एक मुलगी झाली. मात्र, पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. संशयावरून मंगळवारी रात्री १२ वाजता पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. पतीने घरातील बाजूला पडलेली काठी उचलून पत्नीवर सपासप वार करून हत्या केली.

मृतक पत्नीचे नाव विशाखा दीक्षित पाटील (२९) रा. मासळ असे आहे. पोलिसांनी आरोपी पती दीक्षित हरिदास पाटील (३९) रा. मासळ (बु.) याला अटक केली आहे. आरोपी दीक्षित पाटील याची मृतक विशाखा ही तिसरी पत्नी आहे. यापूर्वी आरोपीने विहीरगाव येथील व नागपूर येथील मुलींशी प्रेमविवाह करूनच लग्न केले होते. मात्र, आरोपी संशयी वृत्तीचा असल्याने या दोन्ही पत्नी जास्त काळ टिकल्या नाही. यापैकी एकीची सोडचिठ्ठी झाल्याचे समजते. दीड वर्षापासून विशाखाचा संसार फुलत असताना अधूनमधून पती-पत्नीचे खटके उडायचे. दरम्यान, पतीच्या जाचाला व संशयी वृत्तीला कंटाळून विशाखा एक महिन्याच्या मुलीला सोडून गोंदिया येथे माहेरी गेली होती. ती सात महिने सासरी आलीच नव्हती. यासंदर्भात पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दिली असता आरोपीने पत्नी विशाखा मिसिंग झाल्याची पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पुन्हा विशाखा व दीक्षित यांच्यात मोबाइल फोनवरून प्रेम कहानी सुरू झाली. तब्बल सात महिन्यांनी पुन्हा आई-वडिलांना न विचारता विशाखा परस्पर मासळ येथे सासरी आली होती. आल्याला नुकतेच आठ दिवस झाले होते. पुन्हा मंगळवारच्या मध्यरात्री दोघांत संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. भांडण एवढे विकोपाला गेले की आरोपी पती पाटीलने पत्नी विशाखावर काठीने सपासप वार करत तिची हत्या केली. फिर्यादी प्रिया पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी दीक्षित पाटील याला अटक केली. त्याला चिमूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पीसीआर दिला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड करीत आहेत.

Web Title: Murder of wife on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.