मुलाने केला पित्याचा खून
By Admin | Published: May 12, 2017 02:08 AM2017-05-12T02:08:28+5:302017-05-12T02:08:28+5:30
सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत धुमणखेडा येथे घरकुलाच्या पैशावरून वडील व मुलामध्ये वाद झाला.
धुमणखेडा येथील घटना : घरकुलाच्या पैशाचा वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत धुमणखेडा येथे घरकुलाच्या पैशावरून वडील व मुलामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन मुलाने वडिलाचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.
मृताचे नाव ऋषी गणू धारणे (७०) तर आरोपी मुलाचे नाव दिलीप ऋषी धारणे (४५) आहे. ऋषी धारणे यांची पत्नी मरण पावल्याने ते दुसऱ्या घरामध्ये एकटेच राहात होते. त्यांच्याकडे अडीच एकरच्या आसपास शेती होती. त्यापैकी अर्धा एकर शेती स्वत:कडे ठेऊन त्यांनी उर्वरित शेती मुलगा दिलीप याच्याकडे कसण्यासाठी दिली आहे. दरम्यान, मृताला शासकीय योजनेतून घरकूल मंजूर झाले. त्या घरकुलाचे बांधकाम मुुलगा दिलीप धारणे याने केले. घरकुलाचे बांधकाम जस-जसे झाले त्यानुसार दोन धनादेश मिळाले. हे धनादेश मृताच्या नावाने चेक मिळाले असले तरी त्यांनी ते पैसे मुलगा दिलीप धारणे याच्याकडे सोपविले. मात्र शेवटचा धनादेश मिळायचा होता. तरीही मुलगा दिलीप धारणे वारंवार वडिलाकडे पैशाची मागणी करीत होता. यातूनच वाद वाढत गेला. त्यानंतर मृत ऋषी धारणे हे १० मे रोजी रात्री ८-९ वाजताच्या सुमारास झोपलेले असताना आरोपी दिलीप धारणे याने नायलान दोरीने त्यांचा गळा आवळला. त्यातच ऋषी धारणे यांचा मृत्यू झाला. दिलीप धारणे रात्रभर काहीच झाले नाही, असे भासवून शांतपणे झोपी गेला. दुसऱ्या दिवशी दिलीप धारणे ११ मे रोजी सकाळी उठल्यावर शेजाऱ्याला आवाज देऊन बोलाविले. आपले वडील बोलत नसल्याचे सांगून त्याने पुन्हा वडील ऋषी धारणे यांना हलविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही घटना घडकीस आली. मात्र आपले वडील वृद्धापकाळाने मरण पावले, असे भासवून त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने जमिनीवर तणस टाकून झोपविले. गावकऱ्यांना ते दृश्य खरे वाटले मृतकाला शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथे नेले असून घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सतिश लांजेवार, देशमुख, लेनगुरे अधिक तपास करीत आहेत.
बहिणीने केली तक्रार
प्रत्यक्षात ही घटना वेगळीच असल्याची माहिती मृताची मुलगी निर्मला केशव चौधरी (बोरमाळा) यांना मिळाली. त्यांनी आपला भाऊ दिलीप धारणे याच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर मृताचा गळा आवळून खून केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आरोपीची झडती घेतली. त्यामध्ये दिलीप धारणे याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी दिलीप ऋषी धारणे याला अटक केली आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल व्हायचा होता.