बापरे..! बिबट जाऊन बसला झोपलेल्या महिलेच्या खाटेखाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 08:12 PM2022-04-07T20:12:40+5:302022-04-07T20:13:15+5:30
Chandrapur News रात्रीच्या वेळी घरात शिरून महिला झोपलेल्या खाटेखाली बिबटाने ठाण मांडले. पहाटेच्या सुमारास ही बाब लक्षात येताच घरातील सदस्यांनी राखले प्रसंगावधान.
चंद्रपूरः सावली तालुक्यातील उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट शिरला. भगवानची आई पहाटेच्या सुमारास उठली असता, तिला तिच्या खाटेखाली चक्क बिबट बसलेला दिसला. यामुळे घरातील मंडळी भयभीत झाली. प्रसंगावधान साधून घरातील सर्व मंडळी घराबाहेर आली व बाहेरून दरवाजा बंद केला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने अथक परिश्रमानंतर गुरुवारी सकाळी ८ वाजता बिबट्याला जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सावलीपासून सात किमी अंतरावर असलेल्या उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात बुधवारी रात्री बिबट शिरला. पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भगवानची आई सिंधूबाई लघुशंकेसाठी उठली असताना खाटेच्या खाली काहीतरी असल्याची जाणीव झाली. डोकावून बघितले असता बिबट्याला पाहून तिची भंबेरी उडाली. दरम्यान, या बिबट्याने सून शशिकलाबाई हिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून शशिकला घराबाहेर पडली आणि घराचे दार बाहेरून बंद केले.
तोपर्यंत घरातील संपूर्ण सदस्य बाहेर पडले होते. ही घटना गावात पसरताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. वनविभागाच्या चमूने घटनास्थळ गाठून सकाळी ८ वाजताच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले. यावेळी वनविभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत खाडे, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी, ठाणेदार आशिष बोरकर, ईको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, सावलीचे क्षेत्र सहायक राजू कोडापे उपस्थित होते. सदर बिबट हा अडीच ते तीन वर्षे वयाचा असून, शेळ्या आणि कोंबड्यांवर ताव मारण्याच्या हेतूने तो गावात येत होता. मात्र मध्य वस्तीत शिरून शिकार करण्याच्या नादात तो घरात शिरला. यामुळे गावकरी अजूनही भयभीतच आहेत.