‘मायबाप म्हणते शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:38 AM2018-02-16T00:38:04+5:302018-02-16T00:38:15+5:30
‘मायबाप म्हणते शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक’च्या घोषणा देत चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शासनाच्या अनेक विभागात विविध पदे रिक्त असतानाही शासन नोकर भरती प्रक्रिया राबविण्यास तयार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘मायबाप म्हणते शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक’च्या घोषणा देत चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शासनाच्या अनेक विभागात विविध पदे रिक्त असतानाही शासन नोकर भरती प्रक्रिया राबविण्यास तयार नाही. केवळ कंत्राटी पदभरती राबवून शासन सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा करीत आहे. पोलीस भरतीमध्ये निवृत्त कोटा व प्रचलीत कोटा शंभर टक्के राबविण्याच्या प्रमुख मागणीसह एकूण १९ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील जवळपास पाच हजार सुशिक्षित बेरोजगार सहभागी झाले होते.
गांधी चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा शासन विरोधात घोषणा देत मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मुख्यमंत्र्यांनी १२ हजार जागेसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये पाच हजार ९५७ जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाºया युवकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे.
भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात नोकर भरती राबविण्याचे आश्वासन दिले. मात्र नोकरभरती प्रक्रिया अजूनही राबविली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. सरकार बेरोजगारी दूर करण्यासाठी पकोडे विका, असा सल्ला देत आहे. मात्र सर्वच सुशिक्षित बेरोजगार पकोडो विकले तर खाणार कोण, असा प्रश्नही बेरोजगारांनी यावेळी केला. दरम्यान एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
देखाव्याने वेधले लक्ष
मोर्चादरम्यान अनेक सुशिक्षित बेरोजगार मुलींनी स्कॉलर कोट घालून डिग्री तर आहे, मात्र नोकरी नाही. त्यामुळे मानसिक विवंचनेत बेरोजगार गळफास घेवून आत्महत्या करीत असल्याचे देखावे केले. हे देखावे लक्ष वेधून घेत होते. तर एका ट्रॉलीवर स्कॉलर कोट घालून पकोडे विकत असल्याचे दाखविण्यात आले.
एक मोर्चेकरी पडला बेशुद्ध
गांधी चौकातून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शासनविरोधात घोषणा देत असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रीकांत साव नामक सुशिक्षित बेरोजगार युवक अचानक बेशुद्ध पडला. त्याला रूग्णालयात हलविण्यात आले.
या आहेत मागण्या
चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीसाठी केवळ ६२ जागा काढण्यात आल्या असून त्या जागा वाढवून २५० जागांसाठी भरती घ्यावी, कंत्राटी पद्धतीने शासकीय जागा भरण्यावर बंदी घालावी, राज्यसेवा परीक्षा पदांच्या संख्येत वाढ करावी, जिल्हा भरती नियमीतपणे घ्यावी, परीक्षांचे शुल्क कमी करावे, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी, परीक्षा स्थळ जिल्हा मुख्यालय ठेवावे, एमपीएससी पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करावी, विदर्भातील अनुषेश जाहीर करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांची शासनाने तत्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली.