नगर पंचायतीचे पडघम वाजले
By admin | Published: May 15, 2014 01:00 AM2014-05-15T01:00:51+5:302014-05-15T01:00:51+5:30
राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.
तालुका मुख्यालयाचा दर्जा : नागरिकांकडून मागितले आक्षेप
गडचिरोली : राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या निर्णयानूसार गडचिरोली जिल्ह्यात १0 नगर पंचायत निर्माण होणार होत्या. याशिवाय चामोर्शी व आरमोरी येथे नगर परिषद स्थापन करण्याबाबतची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केली होती. मात्र या संदर्भात नगर पंचायत स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अहेरी, चामोर्शी व आरमोरी या ३ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये या संदर्भात उद्घोषणा करण्यात आली असून प्रारूप अधिसूचनाही राज्य शासनाच्या उपसचिवाकडून जाहीर करण्यात आली आहे. अहेरी ग्रामपंचायतीला या संदर्भात ९ मे रोजी पत्र प्राप्त झाले असून ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्यासाठी नागरिकांकडून आक्षेप ३0 दिवसात मागविण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे हे आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिका आहेत. आरमोरी व चामोर्शी हे दोन मोठे गाव असून या गावांची लोकसंख्या साधरणत: २५ ते ३५ हजाराच्या घरात आहे. या दोन तालुका मुख्यालयांना नगर पालिकेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
आरमोरी येथील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आरमोरी ग्रामपंचायतीचे नगर पालिकेत रूपांतर करावे यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात उपोषणही केले होते. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेटही घेऊन त्यांच्याकडे मागणी केली होती. मात्र राज्य शासनाकडे सध्या आरमोरी येथे नगर पंचायतकरिता अधिसूचना जारी झाली आहे.
त्यामुळे येथील नागरिकांनी याबाबत आक्षेप नोंदविला असून आरमोरीला आत्ताच नगर पालिका म्हणून घोषीत करावे, अशी त्यांची मागणी आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, चामोर्शी, आरमोरी, अहेरी या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळणार आहे. यातील आरमोरी व चामोर्शी या दोन गावांतील नागरिकांनी नगर पालिकेचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली आहे.
सध्या तरी शासनाने नगर पंचायतबाबत अधिसूचना जारी केली असून नागरिकांकडून आक्षेपही मागविले आहेत. त्यामुळे शासन नगर पालिका स्थापण्याबाबत काही निर्णय करते काय विषयी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अद्याप चर्चाच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अहेरी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबत कुणाचेही आक्षेप असल्यास त्यांनी राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३0 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे नोंदवावी.
- ए.व्ही.उंदिरवाडे, ग्रामविकास अधिकारी, अहेरी