विकासाच्या 'समृद्धी'ची नागभीडला हुलकावणी
By घनशाम नवाथे | Published: May 17, 2024 02:25 PM2024-05-17T14:25:09+5:302024-05-17T14:29:25+5:30
नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे संताप : समृध्दी मार्ग नागभीडमार्गेच हवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : प्रस्तावित समृद्धी महामार्गाने नागभीडला हुलकावणी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात या महामार्गाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर या समृद्धी महामार्गावरून नागभीडच्या सोशल मीडियावर नाराजीचे सूर व्यक्त होत आहेत... चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना मध्यवर्ती असलेले नागभीड समृद्धीपासून वंचित राहिल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रस्तावित समृद्धी महामार्ग नागपूर गोंदिया, नागपूर गडचिरोली आणि वर्धा चंद्रपूर, पोंभूर्णा या मार्गाने जाणार असल्याची माहिती आहे. मात्र नागपूरवरून लाखांदूर आरमोरी मार्गे गडचिरोलीला जाणारा हा समृद्धी महामार्ग केवळ शोभेचा आणि पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर, भंडारा, लाखांदूर, गडचिरोली ऐवजी वर्धा सेलडोह-गिरड- भीशी नागभीड- ब्रम्हपुरी आरमोरी गडचिरोली अशी समृद्धी महामार्गाची दिशा दिल्यास तो लोकांच्या अधिक सोयीचा होऊ शकतो. असा दावा केला जात आहे. अगोदरच आरमोरी नागभीड- उमरेड नागपूर हा ३५३ डी राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध असल्यावर समृद्धी महामार्गाने नागपूरसाठी भंडारा मार्गे कोण कशाला प्रवास करतील, अशी शंकाही यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. समृद्धीवर नागपूर किंवा वर्धेहून चढणे हे केव्हाही वेळ, सोय व अंतराच्या दृष्टीने नागभीडमार्गेच असायला पाहिजे, अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.
तर रोजगारही मिळाला असता
अगोदरच विकासापासून कोसो दूर असलेल्या नागभीड येथून समृद्धी महामार्ग गेला असता तर नागभीड तालुक्यात या समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने छोट्या मोठ्या व्यवसायाचे दरवाजे उघडले असते आणि येथील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य माणूस व्यक्त करीत आहेत.
जरी निविदा प्रसिद्ध झाल्या असल्या तरी महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर करून या प्रस्तावित समृद्धी महामार्गाचा फेरविचार करावा. समृद्धी महामार्ग नागभीड मार्गे वर्धा सोयीचा राहील. गडचिरोली - भंडारा समृद्धी मार्ग म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असा राहणार आहे.
- संजय गजपुरे, माजी जि.प. सदस्य, नागभीड