नागभीड-नागपूर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:01:09+5:30
नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
१९१३ पासून या मार्गावर ही नॅरोगेज रेल्वे अव्याहत धावत आहे. पण काळाच्या ओघात या रेल्वे गाडीची उपयोगिता कमी कमी होऊ लागली. सुरूवातीला १९५२ रोजी या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी संसदेत करण्यात आली होती. त्यानंतर १९८२-८३ रोजी या मागणीचा पुनरूच्चार झाला होता. पण पुरेशा पाठपुराव्याअभावी ही मागणी तशीच पडून राहिली. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात १०६ किमी लांबीच्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु प्रत्येक वेळेला अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. मात्र या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
मार्गासाठी ७०८ कोटी ११ लाखांचा खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकारने उचलणार आहे. राज्य सरकारने तशी कबुलीही दिली. या क्षेत्राचे खासदार नेते यांनी मार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी, यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना पण या रेल्वे मार्गासाठी संबंधित विभागाने निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या मार्गाचे काम करणाºया संबंधित कंपणीने येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती आहे. हे गृहित धरूनच १९१३ पासून अव्याहत धावणारी ही नॅरोगेज रेल्वे गाडी बंद होणार असल्याची माहिती आहे. ब्रिटीश कालखंडापासून सुरू असलेल्या या रेल्वेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाला चालना मिळाली. परंतु, प्रवाशांची संख्या वाढल्याने काळानुसार निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली. नॅरोगेज झाल्यास नागपूर-नागभीड अंतर कमी कालावधीत गाठात येईल. यामुळे संपर्काची गती वाढणार आहे.