Coronavirus in Chandrapur; चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात ३२ गावांनी कोरोनाला रोखले गावाच्या वेशीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 10:30 AM2021-04-30T10:30:00+5:302021-04-30T10:30:12+5:30
Coronavirus in Chandrapur सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना नागभीड तालुक्यात ३२ गावांनी कोरोनास आतापर्यंत गावाच्या वेशीवरच रोखून धरले आहे. १६ एप्रिलच्या आकडेवारीनुसार तालुक्यात ३२ गावे अद्यापही कोरोनामुक्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना नागभीड तालुक्यात ३२ गावांनी कोरोनास आतापर्यंत गावाच्या वेशीवरच रोखून धरले आहे. १६ एप्रिलच्या आकडेवारीनुसार तालुक्यात ३२ गावे अद्यापही कोरोनामुक्त आहेत.
मागील वर्षीच्या २३ मार्चपासून तालुक्यात कोरोनाविरुद्ध लढा सुरू झाला. तब्बल दोन महिने या तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला नव्हता; मात्र ३ जून रोजी नागभीड व तालुक्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर कोरोनाचे सत्रच सुरू झाले. बहुतेक गावात कोरोनाचे रुग्ण मिळू लागले. अशाही परिस्थितीत तालुक्यातील ३२ गावे अद्यापही कोरोनामुक्त आहेत.
नागभीड तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व एक ग्रामीण रुग्णालय असून, गावांची एकूण संख्या ११० आहे. या सहाही वैद्यकीय प्रतिष्ठानांकडून सर्वत्र कोरोनाबद्दल जागृती सुरू आहे ; मात्र कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अशाही परिस्थितीत तालुक्यातील ३२ गावे कोरोनापासून दूर आहेत, ही तालुक्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.
या गावात कोरोना नाही
मिळालेल्या माहितीनुसार, नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहा गावात कोरोनाने अद्याप प्रवेश केला नाही. त्यात तिव्हर्ला, चिचोली, रेंगातूर, कोरंबी, कसर्ला, कोथुळणा, कुनघाडा या गावांचा समावेश आहे.
मौशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक गाव कोरोनामुक्त आहे. यात टेकरी या गावाचा समावेश आहे. बाळापूर प्राथमिक केंद्रातील आठ गावांनी कोरोनास गावाच्या वेशीवरच रोखून धरले आहे. त्यात येनोली, राजुली, नवानगर, पारडी, सोनुली, कोसंबी गवळी, गोवारपेठ, वासाळा मेंढा ही ती गावे आहेत. वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्रातीलही ८ गावे कोरोनापासून दूर आहेत. या गावांमध्ये सोनापूर तुकूम, सावर्ला, मेंढा चारगाव, सोनुली, झाडबोरी,आवलगाव,खरकाडा व हस्तिनापूर या गावांचा समावेश आहे. तळोधी ( बाळापूर) प्राथमिक आरोग्य केंद्रातील घोडाझरी, कचेपार, धामणगाव माल, सोनापूर, सारंगड, खरबी, सोनुर्ली, सावंगी, कोजबी चक, चारगाव माना या गावांचा समावेश आहे.