मिनी मंत्रालयात नागभीडला उपाध्यक्ष पदाची परंपरा
By admin | Published: March 5, 2017 12:46 AM2017-03-05T00:46:03+5:302017-03-05T00:46:03+5:30
मिनी मंत्रालयात नागभीडचे स्थान महत्त्वाचे राहिले आहे. या तालुक्यातून निवडून गेलेल्या तिघांना आजवर उपाध्यक्षपदाची तर अनेकांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे.
यंदाही अपेक्षा : जिल्हा परिषदेचे अनेक पदही भूषविले
घनश्याम नवघडे नागभीड
मिनी मंत्रालयात नागभीडचे स्थान महत्त्वाचे राहिले आहे. या तालुक्यातून निवडून गेलेल्या तिघांना आजवर उपाध्यक्षपदाची तर अनेकांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे. हिच परंपरा आताही कायम राहील, अशी आशा नागभीडकर बाळगून आहेत.
१९७८ मध्ये संयुक्त चंद्रपूर जिल्ह्यात मौशी सुलेझरी जि.प. गटातून निवडून गेलेले रामचंद्र हरी मोरांडे यांना चंद्रपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होण्याचा मान मिळाला. काही काळ ते चंद्रपूर जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्षही होते. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याची फाळणी झाली. नवीन गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. त्यानंतर १९९२ पर्यंत चंद्रपूर जिल्हा परिषदेवर प्रशासकीय कार्यकाळ राहिला. १९९२ मध्ये १० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. पाचपैकी चार सदस्य काँग्रेसचे निवडून आले. जिल्हा परिषदेतही काँग्रेसला बहूमत मिळाले पण पदाधिकारी निवडीत मात्र नागभीडवर अन्याय करण्यात आला. मात्र एक वर्षानंतर जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडी घडल्या आणि मौशी-सुलेझरी या प्रभागातूनच निवडून अलोले अॅड. दिगंबर पाटील गुरुपुडे यांची उपाध्यक्ष म्हणूनच वर्णी लागली ते १९९७ पर्यंत उपाध्यक्ष तर होतेच. पण काही काळ त्यांनीही प्रभारी अध्यक्ष म्हणून सुत्रे सांभाळली. याच कार्यकाळात तळोधी-गोविंदपूर येथून निवडून आलेले राजेंद्र बिरेवार जिल्हा परिषदेत सभापती होते.
१९९७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अॅड. गोविंद भेंडारकर मौशी सुलेझरीतूनच काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यांनाही जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणूनच संधी मिळाली. २००२ मध्ये वाढोणा-गिरगावमधून निवडून आलेल्या अशोक गायकवाड यांना सभापती म्हणून संधी मिळाली. २००७ मध्ये मौशी-सुलेझरीतून निवडून आलेल्या प्रफुल्ल खापर्डे यांना तर २०१२ मध्ये नागभीड-कान्पा येथून निवडून आलेल्या ईश्वर मेश्राम यांनी जिल्हा परिषदेत सभापती म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
नुकत्याच झालेल्या जि.प. निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या तालुक्यातून संजय गजपुरे भाजपाकडून निवडून आले आहेत. गेल्या तीस वर्षापासून गजपुरे भाजपाचे काम करीत आहेत. या काळात संघटनात्मक अनेक महत्त्वाची पदे भुषवली आहेत. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी गजपुरे यांचे संबंध जवळचे असल्याने नागभीड तालुक्याच्या परंपरेला साजेल असे चंद्रपूर जिल्हा परिषदेतील पद गजपुरे यांना मिळेल, अशी आशा आहे.