नागभीडचा शिक्षण विभाग झाला अस्थिपंजर
By admin | Published: January 14, 2015 11:06 PM2015-01-14T23:06:49+5:302015-01-14T23:06:49+5:30
रिक्त पदांमुळे येथील शिक्षण विभागाची अवस्था अतिशय अस्थिपंजर झाली आहे. केवळ दोन विस्तार अधिकारी संपुर्ण शिक्षण विभागाचा गाडा हाकत आहेत. एकाच अधिकाऱ्याकडे चार पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
नागभीड : रिक्त पदांमुळे येथील शिक्षण विभागाची अवस्था अतिशय अस्थिपंजर झाली आहे. केवळ दोन विस्तार अधिकारी संपुर्ण शिक्षण विभागाचा गाडा हाकत आहेत. एकाच अधिकाऱ्याकडे चार पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
येथील गटशिक्षणाधिकारी पी.बी.मांढरे यांचे मागील वर्षी स्थानांतरण झाले. तेव्हापासून येथील गट शिक्षणाधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. सदर पद रिक्त झाल्यापासून या पदाचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकारी माणिक खुणे सांभाळत आहेत. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे येथे पाच पदे मंजूर आहेत. आश्चर्य असे की, त्यापैकी वेगवेगळ्या कारणांनी ही तीन पदे रिक्त आहेत. येथील शिक्षण विस्तार अधिकारी माणिक खुणे हे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रभारासह शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नागभीड आणि बाळापूर या दोन बिटांचाही प्रभार सांभाळत आहेत. खुणे यांच्यावरील प्रभाराचा भार एवढ्यावरच थांबला नाही तर, शालेय पोषण आहाराचे अधिक्षक म्हणूनही प्रभार सांभाळावा लागत आहे. या पदासोबतच सर्व शिक्षा अभियानातंर्गत मंजूर करण्यात आलेले अभियंत्याचे पदसुद्धा रिक्त आहे. सद्यस्थिती सर्वशिक्षा अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणावर वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत या कामांची देखभाल आणि मुल्यांकन कशी होत असेल, हा देखील संशोधनाचा विषय आहे. याच अभियानातंर्गत मंजूर असलेले रोखपालाचे पदसुद्धा रिक्त असल्याची माहिती आहे. शिक्षण विभागाला रिक्त पदाचे एवढे ग्रहण लागले आहे की, प्रशासनाचा गाडा खऱ्या अर्थाने जे हाकत असतात त्या कनिष्ठ सहाय्यकांचे ३ पदे सुद्धा रिक्त आहेत. (तालुका प्रतिनिधी)