नागभीडचा पाणी पुरवठा चार दिवसांपासून बंद
By admin | Published: June 18, 2016 12:34 AM2016-06-18T00:34:35+5:302016-06-18T00:34:35+5:30
तपाळ पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने नागभीडला होणारा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे.
तपाळ योजना : तांत्रिक बिघाड
नागभीड : तपाळ पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने नागभीडला होणारा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. परिणामी पाण्याविना नागभीडकरांचे चांगलेच हाल सुरु आहेत.
तपाळ या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे नागभीड शहराला पाण्याचा पुरवठा केला जाते. ही योजना नागभीडपासून ३० किमी अंतरावर असल्याने अनेक संकटाशी सामना करीत नागभीडला पाणीपुरवठा होत होता. तरीही नागभीड येथील सदोष नळ योजनेच्या रचनेमुळे अनेक ठिकाणी पाणीच येत नव्हते. आता तर गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा पुरवठाच बंद आहे.
केवळ नागभीडच नाही तर या योजनेत समाविष्ट असलेल्या नवखळा, चिखलपरसोडी, चिकमारा, ढोरपा, मौशी, ईरव्हा, टेकरी, देवटेक, बाळापूर ही नागभीड तालुक्यातील तर ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव (खुर्द), तोरगाव (बुज.) या गावांचा या योजनेत समावेश आहे. योजनेच्या उगमस्थळावरच तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या गावांचा सुद्धा पाणीपुरवठा नागभीडसारखाच गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या या कृत्रिम पाणी टंचाईची झळ या सर्वच गावातील नागरिकांना बसत आहे. त्यातल्या त्यात नागभीडमध्ये ही झळ सर्वात जास्त जाणवत आहे. नागभीडमध्ये बहुतांश घरी खाजगी विहिरी आणि विंधन विहिरीची व्यवस्था असली तरी पिण्यासाठी मात्र तपाळ योजनेच्या पाण्याचा वापर अधिकांश लोक करीत आहेत. या लोकांची पाण्यासाठी चांगलीच तारांबाळ उडत आहे. नागभीड येथील काही भाग असे आहेत, ते तपाळ योजनेच्या पाण्यावरच अवलंबून आहेत, अशांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)