नागभीड तालुक्यातील नैसर्गिक जलसाठे आटले
By admin | Published: June 16, 2016 01:41 AM2016-06-16T01:41:19+5:302016-06-16T01:41:19+5:30
नागभीड तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. सोबतच वन्यप्राण्यांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे.
शासनाने लक्ष द्यावे : वन्यप्राण्यांची भटकंती
चिंधीचक : नागभीड तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. सोबतच वन्यप्राण्यांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. परंतु प्रत्येक उन्हाळा त्यांच्या जीवावर बेतणारा असतो. आताही जंगलातील जलसाठे आटण्याच्या स्थितीत आहेत.
ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानामुळे व थोड्या स्वार्थासाठी जंगलात वनवा लावतात. त्यामुळे जे नैसर्गिक जंगल असते, ते आपोआप नष्ट होत जाते. तसेच आगीमुळे औषधी वनस्पती, उपजाऊ झाडे नष्ट होत असतात. गवत व झुडपी वनामध्ये वास्तव्य करणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, शेतकऱ्यांना हितकारक असणारे किटक यांचा नाश होत असतो. आगीत हे प्राणी होरपळून गतप्राण होत असतात. सुर्य आग ओकत असल्याने नैसर्गिक जलसाठे आटत आहेत. या कारणामुळे वन्यप्राणी पाण्याअभावी तडपडून मृत्यूमुखी पडत आहेत. काही प्राणी तृष्णा भागविण्यासाठी गावाकडे मोर्चा वळविताना दिसत आहे. परिणामत: त्यांना गावठी कुत्र्याच्या आणि मानवी वक्रदृष्टीला बळी पडावे लागत आहे.
सध्या परिसरातील जंगलामध्ये एखाददुसऱ्या ठिकाणीच पाणी उपलब्ध आहे. परंतु त्याठिकाणीसुद्धा शिकारी टपून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. शासन मानवाला पाणी मिळावे ेम्हणून सतत धडपड करीत असते. पण नैसर्गिक साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वन्यजीवासाठी शासन गंभीर असल्याचे दिसून येत नाही. काही वेळा शासन निधीची तरतूद करते. मात्र वनाधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे योजना कार्यान्वित झालेल्या दिसत नाही. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठ्याची सोय करायला पाहिजे. यामुळे वन्यप्राणी इतरत्र भटकणार नाही व त्यांचा जीवही धोक्यात येणार नाही. (वार्ताहर)