नागपूर बोर्डात २४ लाखांवर दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 02:50 PM2020-06-19T14:50:18+5:302020-06-19T14:50:38+5:30
सध्या नागपूर बोर्डाकडे संपूर्ण उत्तरपत्रिका संकलित झाल्या असून तपासणीचे कामही पूर्ण झाले आहे.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार यासंदर्भात अद्यापतरी तारीख निश्चित झाली नाही. असे असले तरी नागपूर बोर्डाना उत्तरपत्रिका संकलित करण्यापासून तर तपासणीपर्यंतचे काम पूर्ण केले आहे. विभागाने यावर्षी २४ लाख ५४ हजार ५०४ उत्तरपत्रिका तपासल्या असून इतर विभागाच्या कामानुसार राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बारावीची तर मार्चमध्ये दहावीची परीक्षा झाली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. दरम्यान, लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका संबंधित शिक्षकांकडेच अडकून पडल्या होत्या. बोर्डाने शासनानेकडे विशेष परवानगी मागून त्या संकलित केल्या. दरम्यान, सध्या नागपूर बोर्डाकडे संपूर्ण उत्तरपत्रिका संकलित झाल्या असून तपासणीचे कामही पूर्ण झाले आहे. नागपूर विभागात दहावीसाठी १ लाख ८७ हजार ७९७ तर बारावीसाठी १ लाख ६८ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांच्या एकूण २४ लाख ५४ हजार उत्तरपत्रिका तपासण्यासाठी बोर्डाकडे आल्या. या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, राज्यातील इतर विभागातील उत्तरपत्रिका तपासणी तसेच याद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरच दहावी तसेच बारावीचा निकाल लागणार आहे.
गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी बोर्डाने यावर्षी प्रथमच नागपूर येथे न बोलाविता जिल्हास्तरावर समिती गठित करून या माध्यमातून विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. दरम्यान, काही विद्यार्थी यावेळी गैरहजर राहिल्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी बोर्डाने नियोजन केले आहे. यामध्ये २३ जूनला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, २५ ला वर्धा आणि २६ ला नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे समिती म्हणणे ऐकूण घेणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उत्तरपत्रिका संकलित करण्यासाठी थोडाफार वेळ गेला. मात्र सध्यास्थितीत उत्तरपत्रिका तपासणीसह अन्य कामे अंतीम टप्प्यात आहे.
-रविकांत देशपांडे
विभागीय सचिव,
विभागीय मंडळ नागपूर