नागपूर विभागीय बोर्डाने विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:50+5:302021-05-22T04:26:50+5:30
चिमूर : शासनाने कोरोनाच्या संकटकाळात इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. चंद्रपूर जिल्हातील ३३ हजार ७८४ विद्यार्थी दहावीच्या बोर्डांच्या परीक्षेला ...
चिमूर :
शासनाने कोरोनाच्या संकटकाळात इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. चंद्रपूर जिल्हातील ३३ हजार ७८४ विद्यार्थी दहावीच्या बोर्डांच्या परीक्षेला प्रविष्ट झालेले आहेत. मात्र परीक्षा फी साठी घेतलेली प्रति विद्यार्थी शेकडो रुपये प्रमाणे करोडो रुपयांची रक्कम अद्यापही नागपूर बोर्डाकडेच आहे.
सध्याच्या काळात ग्रामीण भागातील जनतेसाठी एक एक रुपया महत्वाचा आहे. त्यामुळे बोर्डाने परीक्षा फी म्हणून करोडो रुपये रक्कम तातडीने परत करावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर बावणकर यांनी नागपूर बोर्डाकडे केली आहे.
याबाबत लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीची रक्कम लाखोच्या घरात आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची एकूण परीक्षा फी किती असेल व ते पैसे बोर्डाने का अडवून ठेवले आहे, असे प्रश्न विद्यार्थी व पालक विचारात आहेत. लॉकडाऊनमुळे यावर्षी शाळा अत्यल्प काळासाठी भरल्या. विद्यार्थ्यांनी जीवाचा आटापिटा करून शक्य त्या माध्यमातून अभ्यास केला व परीक्षेची तयारी केली. बोर्डाने परीक्षा फॉर्म व परीक्षा फीदेखील घेतल्याने आता परीक्षा होणार, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र ऐन परीक्षा तोंडावर असताना ती रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा हिरमोड झाला. तसेच पुढचे प्रवेश कसे होणार, गुणांकन कशा पद्धतीने केले जाणार, या बाबीसुद्धा अद्याप बोर्ड व राज्य सरकारने स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे समस्त शिक्षण क्षेत्रात संभ्रम पसरला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीचे कोट्यवधी रुपये बोर्डाकडे अडकून पडले आहे. ज्या प्रक्रियेसाठी शुल्क आकारल्या जाते, ती होणारच नसल्याने बोर्डाला ते पैसे जवळ ठेऊन घेण्याचा कोणताही अधिकार नाही. या पैशांवर आलेले आजवरचे व्याज बोर्डाने जवळ ठेवावे मात्र विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष भास्कर बावणकर यांनी केली आहे.