शिक्षकांच्या वेतनासाठी चंद्रपुरात ‘नागपूर पॅटर्न’ राबविणार
By admin | Published: July 30, 2016 01:32 AM2016-07-30T01:32:29+5:302016-07-30T01:32:29+5:30
नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी राबविण्यात आलेला पॅटर्न चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी सहविचार सभेत दिले आहे.
नागो गाणारांची उपस्थिती : विविध समस्यांवर चर्चा
बाळापूर : नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी राबविण्यात आलेला पॅटर्न चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी सहविचार सभेत दिले आहे.
म. रा. शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा नुकतीच आ. नागो गाणार यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर व (प्राथमिक) राम गारकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी वेतन पथक अधिक्षक प्रभारी गादेवार, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) साधना केतनपुरे व सहा. लेखा अधिकारी संदीप जेऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेमध्ये शिक्षण विभागातील दफ्तर दिरंगाई, जीपीएफ पावतीची सद्यस्थिती, सत्र २०१५-१६ मधील अतिरिक्त शिक्षक, शिक्षण विभागात दलाली करणारे दलाल, निवडश्रेणी व वरिष्ठश्रेणी प्रकरणे, प्रत्येक तालुक्यातील शाळांत बांधलेले किचन शेड व प्रलंबित अनुदान, वेतन मिळण्यास होणारा विलंब आणि कारणीभूत घटक, जिल्ह्यातील शाळांना बोर्ड मान्यतेच्या कार्यालयात पडून असलेल्या फाईल्स, शिक्षकांचे प्रलंबित जीपीएफ खाते, सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत सेवाअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र न मिळाल्याने वरिष्ठश्रेणी मिळण्यास होणारी अडचण, शिक्षकांनी सेवेत राहून वाढविलेली शैक्षणिक अर्हतेची नोंद, सेवापुस्तिकेत घेण्यास मुख्याध्यापकाकडून टाळाटाळ करणे, जि.प. शाळा शिक्षकांचे वेतन मिळण्यास होणारा विलंब व उपाययोजना, शालेय माध्यान्ह भोजन योजनेत शिक्षकांवर होणारा अन्याय आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
यामध्ये सत्र २०१५-१६ च्या जीपीएफ पावत्या उपलब्ध करून देण्याकरिता शिबिराचे आयोजन करणे, वेतन बिले, वेतन पथकाकडे उशिरा सादर करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापक स्पष्टीकरण मागून कारवाई करण्याची प्रक्रिया राबविणे, अतिरिक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना शाळेकडून कळविले नसेल आणि शिक्षकांना आपल्यावर अन्याय झाले असल्याचे वाटत असेल तर आगाऊ तक्रार माध्यमिक शिक्षणाधिकारी व संघटना पदाधिकारी यांच्याकडे करावी. कार्यालयातील दलालीचा सुळसुळाट बंद करण्यात येईल. जि.प. शाळातील शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला मिळण्याकरिता नागपूर पॅटर्न राबविणे, जिल्ह्यातील १२ शिक्षण संस्थांना पदभरतीबाबत दिलेली मान्यता संबंधीत चौकशी करणे, खाजगी कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांचे होणारे आर्थिक शोषण व पालकांना टी.सी. देण्याची मिळणारी धमकी व अल्प वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना आ. गाणार व म.रा.शि.प. चंद्रपूर ग्रामीणचे पदाधिकाऱ्यांना दिले.
या सहविचार सभेला चंद्रपूर जिल्हा मराशिपचे (ग्रामीण)चे अध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, कार्यवाह रामदास गिरटकार, नागपूर विभाग उपाध्यक्ष रंजीत श्रीरामवार, प्रसिद्धी प्रमुख हरिश्चंद्र पाल, विनोद पांढरे, भुजंगराव मेहेर, विलास खोंड, विलास वरभे, संध्या गिरटकर, नरेंद्र राऊत, विवेक आंबेकर, सरिता सोनकुसरे, विलास नंदूरकर, संजय लोढे, मदन खाडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)