शिक्षकांच्या नागपूर मतदारसंघावर विमाशि आणि मराशिपचाच दबदबा

By राजेश भोजेकर | Published: January 24, 2023 12:24 PM2023-01-24T12:24:00+5:302023-01-24T12:25:27+5:30

शिक्षक मतदारसंघात वाढली चुरस : नागपूरच्या मतांवर उमेदवारांचा डोळा

Nagpur Teachers' constituency dominated by Vidarbha Secondary Teachers Association and Maharashtra State Teachers Council | शिक्षकांच्या नागपूर मतदारसंघावर विमाशि आणि मराशिपचाच दबदबा

शिक्षकांच्या नागपूर मतदारसंघावर विमाशि आणि मराशिपचाच दबदबा

Next

चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी रंगत वाढू लागली आहे. ३० जानेवारी रोजी होत असलेल्या या निवडणुकीसाठी एकूण २२ उमेदवार उभे असले, तरी या मतदारसंघाचा इतिहास बघता विमाशि आणि मराशिप या शिक्षक संघटनांचाच दबदबा असल्याचे दिसून येते. विमाशिने १९७८ पासून तब्बल पाच निवडणुका जिंकल्या आहेत तर मराशिपने तीनवेळा बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही संघटना प्रतिस्पर्धी म्हणूनच पहिल्या वा दुसऱ्या क्रमांकावरच होत्या, हे विशेष.

१९७८मध्ये विदर्भ विभागातून विमाशिचे म. न. काळे निवडून आले. त्यानंतर नागपूर व अमरावती हे महसुली विभाग वेगळे झाल्यामुळे १९८०मध्ये नागपूर विभागातून विमाशिचे प्र. य. दातार निवडून आले. १९८६मध्ये मराशिपने दिवाकर जोशी यांच्या रूपाने विश्वनाथ डायगव्हाणे यांचा पराभव करून या मतदारसंघावर आपले नाव कोरले. मात्र, त्यानंतर १९९३, १९९८ व २००४मध्ये सलग तीनवेळा विमाशिचे विश्वनाथ डायगव्हाणे यांनी या मतदारसंघाला विमाशिचा गड केला. २०१०मध्ये मात्र विमाशिमध्ये फूट पडली. परिणामी नागो गाणार यांनी डायगव्हाणे यांचा पराभव करून १७ वर्षांनी मराशिपने ही जागा पुन्हा जिंकली. २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत विमाशिने चंद्रपूरचे सुधाकर अडबाले यांच्याऐवजी आनंदराव कारेमोरे यांना उमेदवारी दिली. परिणामी संघटनेतील नाराजीचा थेट फायदा गाणारांना झाला व ते दुसऱ्यांना आमदार झाले. या मतदारसंघाचा इतिहास बघता निवडणुकीचे चित्र लक्षात येते. २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी ते जनता दल (यू) या पक्षाकडून लढत आहेत. त्यांना काँग्रेसने समर्थन न दिल्याने ते बॅकफूटवर दिसत आहेत. दुसरीकडे भाजपने गाणारांसाठी ताकद लावली असली, तरी त्यांच्याच संघटनेत काम करणारे वर्धेचे अजय भोयर हे मैदानात उतरल्याने गाणारांची डाेकेदुखी वाढली आहे.

मतांच्या विभाजनाचा फायदा कुणाला?

या निवडणुकीसाठी जवळपास ४० हजार मतदार असले तरी एकट्या नागपूर जिल्ह्यात १६ हजार मतदार आहेत. या मतांवर डोळा ठेवून नागपूर जिल्ह्यातून तब्बल १२ उमेदवार उभे असल्याने मतांची विभागणी कशी होते, यावर सारे काही अवलंबून आहे. यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

Web Title: Nagpur Teachers' constituency dominated by Vidarbha Secondary Teachers Association and Maharashtra State Teachers Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.