त्या नाल्याचे खोलीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:29 AM2021-05-18T04:29:27+5:302021-05-18T04:29:27+5:30
चंद्रपूर : येथील नगिनाबाग सिस्टरल कॉलनी परिसरात असलेला नाला पावसाळ्यात तुडुंब भरत असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच या नाल्याचे खोलीकरण करावे, ...
चंद्रपूर : येथील नगिनाबाग सिस्टरल कॉलनी परिसरात असलेला नाला पावसाळ्यात तुडुंब भरत असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच या नाल्याचे खोलीकरण करावे, अशी मागणी आहे.
घर दुरुस्तीच्या कामांना वेग
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. कधी पाणी येईल याचा नेम नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक घर दुरुस्तीच्या कामाला लागले आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे त्याचा ताडपत्री, आदी साहित्य मिळण्यास अडचण येत आहे.
घंटागाडीवाल्याच्या वेळा बदलवा
चंद्रपूर : येथील सिस्टर कॉलनी परिसरात सकाळी ११ वाजल्यानंतर घंटागाडीवाले कचरा संकलित करण्यासाठी येतात. मात्र, नोकरदारांना दहा वाजता कर्तव्यावर जायचे असल्याने त्यांच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचण जाते.
बँक एजंटना
कोरोनाचा फटका
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहे. याचा फटका बँक एजंटनाही बसला आहे. त्यामुळे अनेकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी दैनिक बचत बंद केली आहे.
शहरातील नाल्यांमध्ये फवारणी करा
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डांतील डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले असून, अनेक घरी लोक तापाने फणफणत आहेत. सर्दी, पडसेही वाढले आहे. त्यामुळे नाल्यांचा उपसा करून सर्वच वार्डांतील नाल्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मास्क न लावणाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वॉच
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असले तरी काही कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मास्क न लावल्यास त्यांच्यावर दंड आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांवर विभाग प्रमुख लक्ष देणार आहेत.
मेस संचालकांचे आर्थिक नुकसान
चंद्रपूर : कोरोनामुळे बहुतांश विद्यार्थी तसेच कर्मचारी आपआपल्या गावाला गेल्यामुळे मेस संचालकांकडे सध्याच्या स्थितीत बोटावर मोजण्याइतकेच ग्राहक येत आहे. परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे साहित्यांचे भावही वाढले आहेत. त्यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सोडला आहे.
बेरोजगार संस्थांना काम देण्याची मागणी
चंद्रपूर : बेरोजगार युवकांनी हाताला काम मिळावे म्हणून बेरोजगार संस्था स्थापन करून त्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या संस्थांना शासकीय पातळीवर कामच मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. कोरोनाच्या संकटकाळात तरी या संस्थांना काम देऊन दिलासा देण्याची मागणी संस्थांचे पदाधिकारी तसेच सदस्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, हे काम मिळेल या आशेने जिल्ह्यातील मोठ्या संख्येने बेरोजगार युवकांनी या संस्थाकडे नोंदणीही केली आहे.
शेतकऱ्यांची शेणखताची जुळवाजुळव चालू
चंद्रपूर : शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यातच खताच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे रासायनिक खताला पर्याय म्हणून शेणखताचा वापर करण्यास शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे शेणखताची जुळवाजुळव शेतकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे.
कुड्याचे फुले विक्रीला
चंद्रपूर : रानमेव्यात गणना होणारे कुड्याचे फूल सध्या मजुरांच्या रोजगाराचे साधन बनले आहे. चंद्रपूर येथील बाजारपेठेत कुड्याची फुले मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बघायला मिळत आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागात कुड्याच्या फुलांपासून बनविलेल्या भाजीला अनेकांची पसंती असते.
विदर्भात झुडपी जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. या जंगलात कुडा वनस्पतीला पोषण वातावरण आहे. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कुड्याची फुले विक्रीला आली आहेत. ग्राहकही मोठ्या पसंतीने खरेदी करताना दिसून येत आहेत.
सॅनिटायझर विनाच सुरू आहेत एटीएम
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र उपाययोजना केल्या जात आहेत. असे असतानाही चंद्रपूर शहरातील काही एटीएम केंद्रांमध्ये सॅनिटायझर तसेच सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात या एटीएममधून धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा
चंद्रपूर : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणीपंप लावण्यात आले आहेत. मात्र, याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाही. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष होत आहे. उन्हाळा असल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी.
अनेकांनी सुरू केला
मास्क विक्रीचा व्यवसाय
चंद्रपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, इतर व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी मास्क विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.