‘त्या’ सभेत निश्चित होणार मनपा स्थायी समिती सभापतीचे नाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:46+5:302021-07-03T04:18:46+5:30
चंद्रपूर मनपात तब्बल चार वर्षे राहुल पावडे यांनी स्थायी समिती सभापतिपदाचा टर्म पूर्ण केल्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये पुन्हा निवडणूक ...
चंद्रपूर मनपात तब्बल चार वर्षे राहुल पावडे यांनी स्थायी समिती सभापतिपदाचा टर्म पूर्ण केल्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये पुन्हा निवडणूक घेण्यात आली. पक्षश्रेष्ठींच्या आशीवार्दामुळे या निवडणुकीत रवी आसवानी यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली. त्यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२१ मध्येच संपला. त्यामुळे एप्रिल २०२१ मध्ये या पदासाठी निवडणूक होईल, असे वाटत होते. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने स्थायी समिती सभापती आणि विषय समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश दिला. माजी सभापती राहुल पावडे यांनी टर्म पूर्ण केल्यानंतरच्या निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला होता. या पदासाठी आग्रही असणारे वसंत देशमुख यांना बाजूला सारून रवी आसवानी यांना सभापतिची संधी देण्यात आली. परिणामी, वसंत देशमुख हे भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांविरुद्ध उघड नाराजी व्यक्त करत आहेत. गत आठवड्यात आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी वसंत देशमुख यांची भेट घेतल्यापाासून मनपाच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने नगरविकास विभागाच्या अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी स्थायी समिती सभापती आणि विषय समितीच्या निवडणुकांवर स्थगितीचा आदेश जारी केला. येत्या सर्वसाधारण समितीच्या सभेत सभापतिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
बॉक्स
दोन सदस्यपदासाठीही भाजपत रस्सीखेच
मनपा स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्यासोबतच संजय कंचर्लावार व सुभाष कासनगोट्टूवार यांचाही समिती सदस्यपदाचा कार्यकाळ ३१ मार्च २०२१ रोजी संपला आहे. कोरोनामुळे त्यांना अधिकचा कार्यकाळ मिळाला होता. मात्र, स्थायी समितीच्या सभापतिंसोबतच सदस्यांचीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच आणि मनधरणी सुरू झाली आहे.
कोट
सभापतिपदाची निवडणूक ऑनलाइन : आयुक्त राजेश मोहिते
नगरविकास विभागाने ९ एप्रिलला दिलेला निवडणूक स्थगितीचा आदेश उठविला आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापती व सदस्य निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव मांडण्यात येईल. ठराव मंजूर झाल्यानंतर प्रस्तावावर पुढील कार्यवाही होईल. सभेची तारीख अद्याप ठरली नाही. सध्या तरी ऑनलाईन सभा व बैठका घेणे सुरू आहे. कोरोना निर्बंधात बदल झाले नाही तर ही निवडणूकही ऑनलाईन पद्धतीने घ्यावी लागणार, अशी माहिती आयुक्त राजेश मोहिते यांनी ‘लोकमत’ला दिली.