जमीन नावावर, पण किती हे सांगता येईना !

By admin | Published: July 2, 2017 12:42 AM2017-07-02T00:42:10+5:302017-07-02T00:42:10+5:30

इंच इंच जमिनीसाठी भावाभावांची भांडणे होतात. जमिनीचा वाद ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, भद्रावतीतील एक व्यक्ती दोन वर्षांपासून जमिनीच्या प्रकरणासाठी भांडत आहे.

In the name of the land, but how many can not tell! | जमीन नावावर, पण किती हे सांगता येईना !

जमीन नावावर, पण किती हे सांगता येईना !

Next

अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद : दोन वर्षांपासून चकरा
वतन लोणे । लोकमत न्यूज नेटवर्क
घोडपेठ : इंच इंच जमिनीसाठी भावाभावांची भांडणे होतात. जमिनीचा वाद ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, भद्रावतीतील एक व्यक्ती दोन वर्षांपासून जमिनीच्या प्रकरणासाठी भांडत आहे. हे प्रकरण भावाच्या विरोधात नसून उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. तक्रारदार व्यक्ती हा माझी जमीन किती एवढाच साधा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारत आहे. तालुक्याच्या जमिनींची जबाबदारी शिरावर असलेले अधिकारी या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ आहे.
यामुळे भूमी अभिलेखाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार व कामचुकारपणा चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील नागरिकांच्या जमिनी सुरक्षित आहेत की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होते. भद्रावतीतील आंबेडकर वॉर्डात संतोष वारलू रामटेके यांची वडिलोपार्जित जमीन व घर आहे. या मालमत्तेमुळे काही कारणास्तव कौटुंबीक वाद निर्माण झाला. कोर्टकचेऱ्या झाल्या. नंतर प्रकरण उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात पोहोचले.
ज्ञानदेव थोरात हे उपअधीक्षक असताना त्यांच्या पीठासनासमोर ११ आॅगस्ट २०१५ ला या प्रकरणावर आदेश देण्यात आला. अतिशय बारकाईने प्रकरण तपासून व अभ्यासपूर्ण असा या प्रकरणाचा आदेश देण्यात आला. प्रकरणाचे आठ वेगवेगळ्या मुद्यांमध्ये आदेश देण्यात आले. मात्र, संपूर्ण आदेशापैकी काहीच मुद्यांचे कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून पालन करण्यात आले. व जमिनीचा हिशोब ठेवणाऱ्या आखिवपत्रिकेवर नोंदी घेण्यात आल्या. नवीन व दुरूस्त केलेली आखिवपत्रिका मिळविण्यासाठी संतोष रामटेके यांनी भूमी अभिलेख कार्यालयात रितसर अर्ज दाखल केला. मात्र, बरीच टाळाटाळ केल्यानंतर त्यांना नवीन आखिवपत्रिकेची प्रत देण्यात आली. नवीन आखिवपत्रिकेनुसार नोंदी घेण्यासाठी संतोष रामटेके यांनी २ जुलै २०१६ ला भद्रावती येथील नगर परिषद कार्यालयात रितसर अर्ज दाखल केला. मात्र, ११ महिन्यांपर्यंत वारंवार चकरा मारल्यानंतर,नवीन आखिवपत्रिकेनुसार नोंद घेवू शकत नाही, असे नगर परिषद कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्याचे कारण विचारल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. त्यानुसार दुरूस्ती केलेली आखिवपत्रिका घेवून संतोष रामटेके यांनी भूमी अभिलेख कार्यालय गाठले. दुरूस्त केलेल्या आखिवपत्रिकेवर भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमिनीचे क्षेत्रफळ टाकण्यात आलेले नाही. त्यामुळेच, जमिन नावावर असूनसुध्दा किती जमिन आहे हे दस्तुरखुद्द वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुध्दा सांगता येणे कठिण झाले आहे. याउलट, आपली झालेली चूक अंगलट येण्याच्या भीतीने पोटहिस्सा मोजणीसाठी अर्ज करण्याचा हास्यास्पद सल्लाही अधिकाऱ्यांनी संतोष रामटेके यांना दिला आहे.

मी प्रभारी असल्यामुळे मला या आखिव पत्रिकेवर छेडछाड करून क्षेत्र टाकता येत नाही.
- प्रमोद निकुरे, प्रभारी उप अधिक्षक,
भूमी अभिलेख कार्यालय भद्रावती

क्षेत्र टाकायचे अधिकार मला नाही. त्यामुळे त्यांच्या जागेचे क्षेत्र मी टाकले नाही. आदेशामध्ये नमुद असते, तर मी क्षेत्र टाकले असते.
- मिलिंद राघोर्ते, निमतानदार, उप अधीक्षक
भूमी अभिलेख कार्यालय, भद्रावती.

Web Title: In the name of the land, but how many can not tell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.